वासना दोन प्रकारांनी निर्माण होतात. एक प्रत्यक्ष प्रेरणेने निर्माण होणारी व दुसरी परोक्ष प्रेरणेने निर्माण होणारी वासना. कोणतीही वासना उत्पन्न होण्यापूर्वी त्या गोष्टीचे मनुष्यास ज्ञान असणे आवश्यक आहे. त्या वस्तूचे ज्ञान नसेल तर त्या वस्तूची वासनाच उत्पन्न होऊ शकत नाही. प्रत्यक्ष प्रेरणाः- एखाद्याला समोरील वस्तू दिसते आणि मनात त्याबद्दलची इच्छा निर्माण होते. तेव्हा ती प्रत्यक्ष प्रेरणा असते. उदा- एखाद्या व्यक्ती भजे खाताना दिसतो, तेव्हा त्याला भजे खाण्याची इच्छा होते. परोक्ष प्रेरणाः- जेव्हा एखादी वस्तू आपले समोर नसते पण त्याबद्दलची कल्पना, विचार आपल्या मनात असतात. ज्यामुळे आपल्या मनात इच्छा निर्माण होते. उदा- भजे दिसत नाही पण खाण्याची इच्छा निर्माण होते म्हणजेच परोक्ष प्रेरणा होय. माझे मते देव आपल्या आतच आहे ही गोष्ट सूर्य प्रकाशा एवढी सत्य आहे पण ह्या आमच्या वासना आम्हाला चैन पडू देत नाहीत. म्हणून देव मिळत नाही. त्यासाठी वासनेचा त्याग करा.
वासने तुज भोवती, किती जन्म घालावे अम्ही ।
भोग हे संपेल का, भोगून होतील का कमी ।।धृ।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वासनेच्या आहारी जाऊन आयुष्य वाया घालविणाऱ्याला भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. माणूस सतत काहीतरी मिळवण्याच्या किंवा इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागतो पण त्यातून खरा आनंद मिळत नाही. तुम्ही किती जन्म वासनेच्या मागे फिरत राहणार. "जन्म घेणे लागे वासनेच्या संगे" संत एकनाथ म्हणतात, वासनावर नियंत्रण ठेवा. त्या वासना आपल्याला पुन्हा पुन्हा या जगात जन्म घ्यायला भाग पाडतात. एका जन्मातील कर्मे त्याच जन्मात भोगून संपत नाही. मग उरलेली कर्मे भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावे लागते.
इंद्रियाचे लाड पुरवावे, तरुणपणी बोलती ।
नाचती ते स्वैर म्हणुनी, कोणी ना त्या अडविती ।
गलित इंद्रिय जाहले, परि तू अजुनीही नमी ।।१।।
इंद्रियाचे लाड पुरवावे असे म्हणतात पण चांगल्या मार्गाने न जाता वाईट मार्गाने जातो. जसे- मोबाईल, प्रेम प्रकरणे, लाॕटरी, जुगार खेळणे, नशा करणे. तो बेधुंद होऊन कोणत्याही औपचारिकते शिवाय मुक्तपणे नाचत असतो. त्याला कुणीही अडविताना दिसत नाही. इंद्रिये हे शरीराचे भाग आहेत. जे विशिष्ट प्रकारचे उत्तेजन किंवा वातावरणातील बदल ओळखू शकतात. त्याचे बुद्धीला ग्रहण लागले असते. तो बेताल, बेफिकीरपणे वागतो. मोठ्यांसमोर मुळीच नमते घेत नाही आणि ऐकत सुद्धा नाही. वासना तृप्त करण्यासाठी फिरत असतो.
केस पिकले, दात पडले. पाय तनघडती अता ।
थरथरे सारी त्वचा, थांबेची ना थांबता ।
नेत्र गेले, कान बुजले, बुद्धीची सुटली हमी ।।२।।
जसजसे वय वाढायला लागते तशी ही शरीररुपी मथुरा नगरी खचायला लागते. मनुष्य वृद्ध झाला आहे त्याचे वय वाढायला लागले आहे असा होतो. ईश्वर दर्शनाची मनात लागलेली ओढ थांबता थांबेना कारण शरीर साथ देत नाही. केस पिकायला लागतात. दात पडायला लागतात. पायातील ताकद किंवा सहनशक्ती कमी होऊन अशक्तपणा जाणवायला लागतो. सारी त्वचा थरथरायला लागते. डोळे आणि कान दोन्ही अधू झाले किंवा दृष्टी आणि श्रवण शक्ती नाहिशी झाली. "साठी बुद्धी नाठी" साठ वय झाल्यावर मनुष्याला अनेक व्याधींची लागण होते. बुद्धी ही पूर्वीसारखी तरतरीत राहू शकत नाही. कधी कधी बालकासारखी आपली अवस्था होते. तरी वासना सोडायला तू मुळीच तयार नाही.
लागली काठी करी. कफ पित्त उसळे बाहेरी ।
स्वैर सुटले मुत्र मल ते, राहती जै लाजरी ।
तरी न तुजशी लाज ये, तू पुन्हा पुन्हा विषयी रमी ।।३।।
म्हातारपण लागलं की, व्यक्तीला चालण्यासाठी काठीचा आधार, मदतीची गरज भासते. चालताना तोल जातो. शरीराची ताकद कमी होते. हाडे कमजोर होतात. शरीरात वात, कफ, पित्ताचे प्रमाण वाढून असमतोल निर्माण झाल्यामुळे मानसिक समस्या उद्भवतात. स्वैर सुटले म्हणजे मर्यादा न पाळता मुक्तपणे वावरतो. मुत्र आणि मल वस्त्रामध्ये होते. तेव्हा लाज वाटते. एवढं सारं होत असताना तुला लाज येत नाही. तू विषय वासनेत रममाण होतोस. सांसारिक गोष्टीमध्ये, इंद्रिय सुखामध्ये तू खूप गुंतून राहतो. वासना काही केल्या कमी होत नाही.
नाश केले जन्म सारे, पुत्र पौत्रा पाहता ।
लाडविता हसविता आणि पाळण्यासी झुलविता ।
आज तरी करी मुक्त मज, हे चित्त रंगू दे गुणी ।।४।।
मुलगा, नातवाला पाहता पाहता संपूर्ण जीवन नष्ट केले. जन्माचा नाश केला. नातवाला अंगाखांद्यावर घेता घेता लाड केले. त्याला हसविले आणि पाळण्यात टाकून झुलविले. तरी वासनेचा त्याग मुळीच करीत नाही. देवाला म्हणतोस, मला बंधनातून मुक्त करा, माझे मन चांगल्या गोष्टीमध्ये, सद्गुणामध्ये गुंतून राहू दे. वासना मुक्त जीवन होऊ दे.
दास तुकड्या सांगतो, वैराग्य टिकू दे वृत्तीचे ।
नष्ट आसक्ती करी, परी ध्यान लागो भक्तीचे ।
मरणी तरी लय साधू दे, त्या सद्गुरु पद चिंतनी ।।५।।
राष्ट्रसंत सांगतात की, वैराग्य टिकू दे वृत्तीचे. म्हणजे मनाची वृत्ती स्थिर आणि दृढ असेल तरच वृत्ती टिकते. वैराग्य म्हणजे फक्त जगाचा किंवा भौतिक वस्तूंचा त्याग करणे नाही तर मनाची अशी अवस्था आहे की जेथे विषया बद्दलची आसक्ती कमी होते आणि त्यातून येणारे सुख दुःख कमी जाणवतात. वैराग्य टिकविण्यासाठी मनाची तयारी असणे आवश्यक आहे. आसक्ती नष्ट करणे म्हणजे एखाद्या गोष्टीशी, व्यक्तीशी असलेली तीव्र भावना, ओढ कमी करणे किंवा पूर्णपणे सोडून दिल्यावरच भक्तीचे ध्यान लागेल. भक्तीचे ध्यान म्हणजे भक्तीमध्ये पूर्णपणे लीन होऊन आपले मन आणि विचार भगवंतावर केंद्रित करणे. मरणी लय साधू दे म्हणजे मृत्यूच्या वेळी शांतता लाभू दे, आत्मिक शांती मिळू दे किंवा मृत्यू येईल तेव्हा कोणताही त्रास किंवा भिती नसावी. सद्गुरु पद चिंतनी लागणे म्हणजे सद्गुरुच्या चरणाचे सतत स्मरण करणे किंवा त्यांच्या उपदेशाचे चिंतन करावे. वासनेचा विचार मुळीच करु नये.
शब्दांकन:-
लेखक पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....