कारंजा (लाड) : शहरातील मध्यवस्तीतील मेन रोडवरील दिल्ली वेश दुरुस्तीच्या कामाकरीता पाडून ठेवण्यात आलेली आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून वेस दुरुस्तीचे काम संतगतीने सुरू असून मागील तीन वर्षांपासून निधी अभावी काम पूर्णपणे रखडले आहे. रखडलेल्या या कामाकडे लक्ष लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन नागरिकांना राहदरीस मार्ग उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सविस्तर असे की, कारंज्याच्या वैभवशाली चारही वेशी या ऐतिहासिक आहेत. अशा स्थितीत शहरातील पूर्व दिशेस दारव्हा वेस, पश्चिमेस पोहा वेस, उत्तरेस दिल्ली वेस, दक्षिणेस मंगरूळ वेस या ऐतिहासिक ठेवा असलेल्या वेशी शहराला लाभलेल्या आहे. काही काळाअगोदर या चारही वेशींची अवस्था शिकस्त झाल्यामुळे अत्यंत दयनीय होती. या चारही वेशीतून नागरिकांचे व वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन असल्यामुळे व काही वेशींच्या बाजूला नागरी वस्ती असल्यामुळे या शिकस्त वेशी कधीही कोसळून जीवित व वित्तीय हानीसुद्धा संभवत होती. इ.स.२०१२-१३ मध्ये यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला. त्यातून मंगरूळ वेशीचे व पोहा वेशीचे काम पूर्ण झाले व ती नागरिकांच्या आवागमनास आता जनसेवेत रुजू झाली आहे. परंतु, काही निधीअभावी रखडले तसेच दिल्ली वेशीचे कामही निधीअभावी रखडले आहे. दिल्ली वेस या मार्गाने जाणाऱ्या बहुसंख्य कॉलोनीतील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
दोन वर्षांपासून काम बंद..?
मुख्य मार्गावरील दिल्ली वेशीची इमारत पाडून आज जवळपास दोन वर्ष झालेले आहे. मात्र कोणतेही काम झालेले नाही, तसेच सदर इमारत पाडतांना मेनरोड वर रस्त्याच्या मध्यापर्यंत टिनाचा कठडा तयार केलेला आहे.त्यामुळे रस्त्याचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग हा व्यापला गेलेला आहे त्यामुळे त्याचा रस्त्यावरील वाहतुकीस नेहमीच अडथळा येतो व रस्त्यामध्ये नेहमीच नागरीकांमध्ये वादविवाद होऊन मारामारी पर्यंत प्रकरण जाते.
मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी
सदर रस्ता हा शहराचा मुख्यमार्ग आहे व सद्या सणाचे दिवस असल्याने रस्त्यावर खुपच गर्दी होत आहे व वारंवार नागरीकांमध्ये वादविवाद होत आहेत.आणि आजरोजी सदर वेशीची इमारत ही पूर्णपणे पाडून ठेवण्यात आलेली आहे व वेशीच्या दुरुस्तीचे कोणतेही काम चाललेले नाही, त्यामुळे आजच्या परीस्थितीत तेथे कोणत्याही प्रकारची हानी होण्याची शक्यता नाही उलट वाहतुकीस अडथळा होत आहे.
शैक्षणिक व धार्मिक संस्थांसह अनेक वस्त्यांकडे जाणाऱ्यांना सहन करावा लागतो त्रास
वेशीच्या मागील भागात काजी प्लॉट, लाहोटीनगर, टीचर कॉलनी, लक्ष्मीनगर, विदर्भ कॉलोनी, आनंद नगर,बिलाल नगर, जिया कॉलोनी, मेमन कॉलोनी, इंगोले नगर इ. वस्त्या आहेत, त्याचप्रमाणे शहरातील प्रसिध्द के.एन.कॉलेज, चवरे कॉलेज, फातेमा मस्जीद, जैन मंदिर, बिलाल मस्जीद यासारख्या मोठे शिक्षणसंस्था व धार्मीक संस्था आहेत व तेथील नागरीकांना जाण्यासाठी वेशीच्या मागील भागात मेमन जमातखाना जवळ फक्त एकच पर्यायी रस्ता आहे आणि तो सुध्दा वाहतुकीस अतीशय अडचणीचा आहे व त्याठिकाणी सुध्दा रोजच नागरीकांमध्ये वादविवाद होत असतात, त्यामुळे या सणासुदीच्या काळात वादविवाद होऊन शहरातील वातावरण दूषित होऊन कायदा व्यवस्था बिघडण्याची पूर्ण शक्यता आहे, यास्तव मेन रोड वरील वेशीच्या समोरील भागामध्ये लावण्यात आलेला टिनाचा कठडा काढून वेशीचा रस्ता खुला करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....