अकोला:-
दृष्टी बाधितांच्या मदतीकरिता जगद्विख्यात गझल नवाज पंडित भीमरावजी पांचाळे यांच्या सुरेल मैत्री शब्द सुरांची भावयात्रा या कार्यक्रमानिमित्त भीमराव पांचाळे यांनी पाठवलेले पत्र
\" प्रकाशयात्रा \"
जेथे नसेल डोळा
तेथील सूर्य काळा
ठेवू जिवंत आम्ही
मरणोपरांत डोळा
अकोल्याचेच आमचे दिवंगत गझलकार व्यंकट देशमुख यांच्या या दमदार शेरांची आवर्जून आठवण येतेय आज ...
खूप अंध मित्र आहेत माझे , त्यातील बरेच कलावंत आहेत आणि माझी संगत सुद्धा करतात. त्यांची रसास्वाद क्षमता तर .. क्या कहने !
माझा अंधमित्र बदलापूरचा मजहर शेख हा उत्तम संवादिनी वादक , गायक आणि कंपोजर आहे. पंडित मनोहर चिमोटे यांचा तो शागीर्द आहे.
त्याच्या \"अस्मिता \" संस्थेच्या माध्यमातून खूप काम तो करतो.
त्याच्या संस्थेच्या पाठीशी मी यथाशक्ती उभा असतो..असो !
\" स्पर्शांकुर \" हा ब्रेल लिपीतील संग्रह अंध बांधवांसाठी काढतांना त्याची आणि नॅब ची मोलाची मदत झाली मला.
हा संग्रह \"मुक्ताई अंध कल्याण संघ\" करिता मी घेऊन येईन
गझल गायनाच्या माझ्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मागच्या वर्षी गझल गायनाची एक वेगळी मैफिल शिवाजी मंदिर , दादर , मुंबई येथे \"अस्मिता \" च्या सहाय्यार्थ सादर केली होतो ... ज्यामध्ये मी वगळता सर्व साथीदार अगदी निवेदक सुद्धा अंध होते.
या मैफिलीला
\" शब्द सुरांची प्रकाशयात्रा \" असे शीर्षक दिले होते.
अजून एक सांगायचे म्हणजे -
मागच्याच वर्षी जे जे हॉस्पिटलच्या \" ऑगस्ट मेलडीज \" या ऑर्गन डोनेशन ड्राइव्ह साठी एक मैफिल मी पेश केली.
त्याच मैफिलीचे निमित्त साधून आम्ही खूप दिवस काळजात रेंगाळणारे एक मनभावन काम केले - मी आणि सौ गीताने मरणोपरांत आमचे नेत्र आणि देहदान केले.
हे काही मोठे कार्य वगैरे नसून कर्तव्यच आहे कोणत्याही कलावंताचे. ज्या समाजाने आपल्याला जगवले , मोठे केले त्याच्या रसिकतेला दिलेली ही दाद असू शकते फार तर ...!
अकोल्याला , माझ्या कर्मभूमीत श्री सुखदेवराव वाघमारे मी त्यांना अजून पाहिलेही नाही यांच्या \" मुक्ताई अंध कल्याण संघ \" संस्थेसाठी \"प्रकाशयात्रा साकारण्याचा योग जुळून आला आहे.
तुम्ही सगळे झटून कामाला लागलेले माझे गझल गणगोत आहात.
शिवाय
मित्रवर्य श्री सुगतजी पाठीशी उभे आहेत भक्कमपणे.
आपल्या आयोजनाची यशस्विता इथेच अधोरेखित झालेली आहे.
तुम्हा सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार..आणि शुभेछा...
दिल रख दिया है सामने ला कर खुलूस से
अब इस के आगे काम तुम्हारी नजरका है
आपला नम्र ,
भीमराव
मुक्ताई अंधकल्याण संघ दृष्टी बाधितांच्या मदतीकरता जगत विख्यात गझल नवाज श्री भीमराव पांचाळे यांची सुरेल मैफिल शब्द सुरांची स्थळ खुले नाट्यगृह गांधी रोड अकोला दिनांक 5 एप्रिल 20 25 रोजी संध्याकाळी सात वाजता आयोजित केला आहे मदतीकरता प्रकाश अरविंद बागडे संपर्क नंबर 9890812042
आपल्या प्रतिक्रिया द्या....