गडचिरोली : शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा आहे. अशी प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिली.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस पाडून सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प आहे. मोठ्या शहरांवर लक्षकेंद्रित अर्थसंकल्प असून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता कुठल्याही भरीव निधीची किंवा नवउद्योगाची तरतूद नाही. अवकाळी पावसाने नुकसानाग्रस्त शेकऱ्यांसाठी आणि कृषीपंपासाठी मुबलक प्रमाणात वीज पुरवठ्याकरिता कोणतेही ठोस पाऊल उचलेले दिसत नाही. उलट राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असताना देखील, राज्यातील उद्योग धंदे बाहेर नेल्या जात आहेत. कुठल्याही प्रकारच्या नव्या उद्योगाची घोषणा दिसत नाही. सर्वसामान्य केशरी शिधापत्रिका धारकांना मुभलक दरात मिळणारा राशन बंद करून त्याऐवजी शुल्लक रक्कम देण्यात येणार आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना मिळणारा राशन बंद होईल. यामुळे जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांची या सरकारने निराशा केल्याचे मत जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले.