कारंजा (लाड) कारंजा ते शेलू बाजार मार्गे संभाजीनगर महामार्गावरील श्रीक्षेत्र तपोवन येथील श्री सरस्वती देवी मंदिरावर,श्रावण पोर्णिमेनिमित्ताने,दि 19 ऑगस्ट रोजी,रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.यावेळी प्रातःकाळी बुद्धी व कलेची देवता असलेल्या श्री सरस्वती देवीचा महाभिषेक व श्रूंगार करण्यात येवून उपस्थित भाविकांकडून देवीला खण-नारळ -साडी-बांगड्यांची ओटी भरण्यात आली.त्यानंतर देवीची महाआरती झाली. या प्रसंगी बोरगाव येथून आलेल्या महिला प्रवचनकार यांच्या अमृत वाणीमधून प्रवचन झाले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. कारंजा ते शेलू मार्गावर विद्येची देवता शारदा श्री सरस्वती देवीचे एकमेव जागृत मंदिर असून संत प.पू. श्री.पांडूरंग महाराज किर्तने यांच्या सान्निध्याने येथे पंचक्रोशीतील भाविकांची नेहमी गर्दी होत असते. श्री सरस्वती मातेच्या कृपाप्रसादाने अनेक विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार यांना येथे साक्षात्कार होऊन त्यांच्या मनोकामना पूर्णत्वास गेल्या आहेत. सदर मंदिराचा जिर्णोद्धार होऊन सभागृह होणे गरजेचे आहे. तरी सद्भक्त मंडळीनी सभागृह बांधकामा करीता सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.