वाशिम : आज दिनांक २९ जून रोजी मौजे बोराळा येथे साथरोग सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना यांची पाहणी करणेसाठी वाशिमचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी भेट देऊन तेथील नागरिकांना घाबरून न जाता व अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घ्यावी, सर्वांनी पावसाळ्याच्या दिवसात कमीत कमी २० मिनिटे उकळून गार केलेले पाणी पिण्यास वापरावे. बाहेरगावी जाताना सुद्धा हेच पाणी सोबत न्यावे अथवा शुद्धीकरण केल्याची खात्री असलेले पाणी प्यावे अन्यथा शुद्ध बाटलीबंद पाणी प्यावे. उलटी, मळमळ, अतिसार, हगवण यासारखी लक्षणे आढळून आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यात उपचारास जावे असे आवाहन त्यावेळी त्यांनी केले. त्यांचेसोबत मालेगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी खासबागे, वैद्यकीय अधिकारी डॉ बोरसे व आरोग्य सहायक काळे उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या चमूने संशयित साथरोगाच्या अनुषंगाने त्यांनी बोराळा येथील पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्त्रोताला भेट दिली. तेथील प्रतिबंधात्मक उपाययोजना पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच
गावच्या सार्वजनिक टाकीचे आउटलेट आणि इनलेटसुद्धा तपासले. त्याचप्रमाणे त्यांनी गावातील संशयित कॉलरा रुग्णाची घरी जावून भेट घेतली व सर्व परिस्थितीची माहिती घेऊन पुढील आवश्यक औषधोपचार व पाळावयाचे पथ्य याबाबत सूचना दिल्या.
सध्या या गावामध्ये कुठेही साथरोग सदृश्य परिस्थिती आढळून आली नाही. परंतु गावातील सद्यस्थितीतील संशयित कॉलरा रुग्ण यांना या साथीची लागण ही मौजे शेलुबाजार येथून झाल्याची त्यांनी खातरजमा झाली आहे. त्या अनुषंगाने गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घरोघरी जाऊन नेमण्यात आलेल्या आरोग्य पथकाने भेट देऊन सर्वेक्षण केले, परंतु त्यांना कुठल्याही पद्धतीचे जलजन्य आजाराचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. आरोग्य पथक गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून याकामी प्रा.आ.केंद्राचे आरोग्य सहाय्यक गुळदे, आरोग्य सेवक प्रशांत मस्के, श्री.लांडगे, गोपाल तायडे, शैलेश शिरपूरकर व वाहन चालक उल्हास कळमकर हे सहकार्य करीत आहेत. तसेच साथरोग सर्व्हेक्षण करणे करिता गावातील अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांनी कार्य तत्परता दर्शवली आहे. यावेळी या गावातील सरपंच जटाळे व ग्रामसेवक गावंडे उपस्थित होते.