वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून वयोवृद्ध साहित्यीक कलावंता करीता, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी,दरमहा वृद्धापकाळ कलाकार मानधन देण्याची योजना असल्यामुळे, वाशिम जिल्ह्यातील कलेच्या भरवशावर गुजरान करीत असलेल्या शेकडो गरजू,निराधार, वयोवृद्ध,दुर्धर आजारी,दिव्यांग स्त्री-पुरुष लोककलावंतानी मानधन प्राप्ती करीता गेल्या सहा सात वर्षापासून प्रस्ताव सादर केलेले होते. परंतु इ.सन 2019 पासून, पालकमंत्री महोदयांनी जिल्हा निवड समितीचे गठनच केले नसल्याने सदरहु प्रस्ताव प्रलंबीत होते.त्यामुळे विदर्भ लोककलावंत संघटनेने,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षात अनेक वेळा मोर्च, धरणे आंदोलने करून व मुखमंत्री-उपमुख्यमंत्री-सांस्कृतिक मंत्री व त्यांचे सचिव यांना प्रत्यक्ष भेटून व वेळोवेळी पत्रव्यवहार करून, कलावंताचे प्रलंबीत असलेले प्रस्ताव निकाली काढून कलावंतांना दरमहा मानधन सुरू करण्याची मागणी रेटून धरलेली होती. त्यामुळे अखेर शासनातर्फे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते खाली शासकीय अधिकारी यांच्या जिल्हा निवड समिती द्वारे कलावंताचे मानधनाचे प्रस्ताव मंजूर करण्याचे सुचित केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जि.प.समाज कल्याण कार्यालयाकडून चार महिन्यापूर्वी दि. 04 मार्च 2024 ते दि.10 मार्च 2024 पर्यंत, जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्याच्या ग्रामिण खेडेगावातील व शहरी वयोवृद्ध कलावंताना रितसर लेखी पत्र पाठवून त्यांच्या लोककलेचे सादरीकरण व प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्यात. दरम्यान लोकसभा निवडणूका लागल्याने आचारसंहिता लागली. त्यानंतर निवडणूका होऊन निकालही लागला व आचारसंहिता संपुष्ट होऊन नियमीत कामकाजही सुरु झाले. गेल्या चार महिन्यापासून कलावंत मंडळी मानधन मंजूर होऊन लवकरच खात्यात जमा होण्याची प्रतिक्षाही करू लागले.यात उल्लेखनिय म्हणजे गेल्या सहा सात वर्षापासून प्रस्ताव प्रलंबीत असल्याने मानधना करीता आशावादी असणाऱ्या कित्येक कलावंताचे तर दरम्यानचे काळात मृत्यु देखील झाले आहेत.परंतु शासनाने अद्यापपावेतो सन 2024 मध्ये मानधना करीता मंजूरी देण्यात आलेल्या लाभार्थी कलावंताची यादी मंजूर केलेली नाही.त्यामुळे सदर कलावंताची यादी जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषदेतर्फे लवकरात लवकर जाहिर करावी.अन्यथा दि.14 ऑगष्ट 2024 पासून,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा तर्फे शेकडो अन्यायग्रस्त वयोवृद्ध कलावंतासह बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी शासनाला दि.27 जून 2024 रोजी दिला असून, उपोषण काळात एखाद्या वयोवृद्ध दुर्धर आजारग्रस्त लोक कलावंताची जीवीतहानी झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहणार असल्याचे म्हटले आहे.