कारंजा (लाड) : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) श्रीक्षेत्र माहूरगडचे श्री रेणुका माता संस्थान हे साडेतिन पिठापैकी प्रमुख असल्यामुळे या संस्थानवर चैत्र आणि आश्विन नवरात्रात, देश विदेशातून करोडो मातृशक्ती उपासकाची मांदियाळी बघायला मिळत असते. शिवाय श्री रेणुका माता करोडो मातृशक्ती उपासकांचे दैवत असल्यामुळे येथे दररोज लाखो भाविकांची दर्शनाकरीता गर्दी होत असते. शिवाय आपल्या पंचक्रोशीतील मराठवाड्यातील हिमालय म्हणूननही या ऋषी महंत मंडळीच्या पवित्र भूमीला ओळखले जाते. देवभूमी, संतभूमी, तपोभूमी असलेल्या माहूरगडाला राजवैभव प्राप्त असून याच ठिकाणी आई रेणुका मातेची जन्मभूमी कर्मभूमी मानले जाते. भगवान परशुरामाची युद्धभूमी म्हणूनही ओळखले जाते. ही भूमी अत्री अनुसया मातेच्या पावन सान्निध्याने आणि अन्नपूर्णेच्या साक्षात्काराने दतात्रयाची जन्मभूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे.
प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण व जानकी मातेची वनभूमी, पांडवाची अज्ञातवासातील निवास भूमी म्हणूनही प्रसिद्ध असल्याने सनातन हिंदुधर्मीयामध्ये या स्थळाला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त आहे. त्यामुळे येथील दर्शनार्थीची संख्या विचारात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्या करीता श्री रेणुका मातेचे निस्सिम भक्त असलेले, भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांच्याच पुढाकाराने तिर्थक्षेत्र व पर्यटन आराखड्या अंतर्गत माहूरगडच्या विकासाचे कार्य हाती घेण्यात आलेले असून नांदेड जिल्ह्यातील, किनवट तालुक्यात येणाऱ्या श्रीक्षेत्र माहूरगड येथे विविध विकास कामांसोबतच स्कॉयवॉक रोप वे इत्यादी कामाचा आणि जवळ जवळ एक्कावन्न करोड रुपये अंदाजित खर्चाच्या विकास कार्याचा भूमीपूजन सोहळा सन्माननिय केंद्रिय मंत्री ना नितिनजी गडकरी यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र शासनातील मंत्री, लोकसभा मतदार संघाचे खासदार यांच्या उपस्थितीत दि.२० मे २०२३ रोजी श्रीक्षेत्र माहूर संस्थानवर होणार असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. या स्कायवॉक व रोप-वे, कॅप्सुल लिफ्ट, प्रतिक्षालय, पिण्याचे पाणी, विद्युत सुशोभीकरण, भक्तनिवास, प्रतिक्षालय इ व्यवस्थां मुळे श्रीरेणुका देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, महिला व लहान बालकांना दर्शन सुलभ व सोयीचे होणार आहे. शिवाय दिव्यांगाकरीता विशेष सुविधा असणार असल्यामुळे दोनशे चाळीस पायऱ्या चढून गडावर जाण्याची गरज राहणार नाही .
या व्यतिरिक्त आसपास असणाऱ्या सर्वच मंदिरावर व पर्वत शिखरावर जलद जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे . केवळ अठरा महिन्याच्या कालावधीतच शासनाकडून सर्व सोई सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.शासनाच्या या वचनपूर्तीमुळे मातृशक्ती उपासकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र प्रधानमंत्री मा .नरेंद्र मोदी व केन्द्रियमंत्री मा.नितिनजी गडकरी यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहे.