चंद्रपूर : तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या एका 56 वर्षीय मजूरावर जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची खळबळजणक घटना आज सोमवारी (१६मे) ला उघडकीस आली. खुशाल गोविंदा सोनुले रा. भादुर्णा(ता. मूल) असे मृताचे नाव आहे. ही घटना मूल तालुक्यातील मारोडाच्या जंगलात उघडकीस आली.
दरवर्षी उन्हाळा आला तेंदूपत्ता तोडाईला सुरुवात होते. गोरगरीब मजुरांना तेंदुपत्ता संकलनातून रोजीरोटी उपलब्ध होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तेंदूपत्ता सोडविण्याकरिता जंगलात जातात. अशाच रोजीरोटीच्या शोधात मूल तालुक्यातील ५६ वर्ष वय असलेला भादुर्णी येथील खुशाल गोविंदा सोनुले हा मारोडा येथील जंगलात तेंडुपत्ता तोडण्याकरिता काल रविवारी ( १५ मे) गेला होता. सोबत काही नागरिकही होते. सोबती तेंदूपत्ता तोडून घरी आले, परंतु सदर इसम सायंकाळ झाली तरी घरी परत आला नाही. याची माहिती होताच सर्वत्र त्या इसमाची शोधाशोध सुरु झाली. बराच वेळ शोधाशोध घेतल्यानंतरही ठावठिकाणा लागला नाही. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.
वनविभागाच्या अधिका-यांनी आज सोमवारी (१६ मे) सकाळी काल जंगलातून घरी परत न आलेल्या इसमाकरीता शोधमोहीम राबविली. मारोडा बिटातील 2 जंगल परिसरात खुशाल गोविंदा सोनुले याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे छिन्नविछिन्न अवस्थेत तुकडे आढळून आले. सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिका-यांना मिळताच मूलचे वनपरीक्षेत्राधिकारी नायगमकर, क्षेत्र सहाय्यक पाकेवार, वनसरक्षक वट्टे, यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. वनविभागाच्या वतीने मृतकाच्या कुटूंबियांना २५ हजाराची मदत देण्यात आली आहे.
मे महिण्यात वाघाच्या हल्यात तिघांचा बळी
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्यात नागरिक ठार होण्याच्या घटनांत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. दरवर्षी फक्त उन्हाळ्यात महिनाभराच्या हंगामातून शेतकरी शेतमजूर तेंदूपत्ता संकलन व मोहफूल वेचून मिळणा-या आर्थिक स्त्रोतातून उदरनिर्वाह करतात. मात्र वाघाच्या दहशतीमुळे रोजीरोटी हिरावल्या जात आहे. एकट्या मे महिण्यात तेंदूपत्ता तोडायला व मोहफूल वेचायला गेलेल्या तिघांचा वाघाच्या हल्यात बळी गेला आहे.
आज सोमवारी मूल तालुक्यातील भादूर्णी येथील 56 वर्षीय खुशाल गोविंदा सोनुले याचा पट्टेदार वाघाच्या हल्लात मृत्यू झाला आहे. शनिवारी (14 मे) रोजी सकाळी ताडोबाच्या बफर झोनध्ये मोहूर्ली येथील जाइबाई जेंगठे ही वयोवृध्द महिला तेंदूपत्ता तोडायला गेली होती. तिचाही वाघाच्या हल्यात मृत्यू झाला. तर गुरूवारी (5 मे 2022) ला मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या नागभिड तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी येथील 52 वर्षीय आडकू मारोती गेडाम याचाही पट्टेदार वाघाच्या प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाला.