कारंजा . : स्थानिक जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजा, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा आणि संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद सांस्कृतिक विभाग कारंजाच्या संयुक्त विद्यमाने, देहू येथील श्री संत तुकाराम संस्थानच्या तिथी प्रमाणे, गुरुवार दि. २ फेब्रुवारी रोजी, मराठा समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली, सिंधी समाज युवक संघटनेचे महेश जवाहरमालाणी, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे तथा शहर अधक्ष व पत्रकार उमेश अनासाने यांचे प्रमुख उपस्थितीत संत तुकाराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी उपस्थित मंडळीच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांचे पूजन व हारार्पण करण्यात आले. यावेळी आपल्या संभाषणातून बोलतांना संजय कडोळे यांनी सांगीतले की,
"थोर समाज सुधारक जगदगुरु संत तुकाराम यांचे संपूर्ण जीवन म्हणजे दयेचा ओतप्रोत सागर होते. त्यांच्या प्रत्येक अभंगामधून नव्हे नव्हे अभंगाच्या प्रत्येक ओळी मधून अविरत ज्ञानामृत मिळत आहे. व आचंद्रदिवाकरौ ज्ञानामृत मिळत राहणार आहे. प्रत्यक्ष हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी त्यांच्या निःस्वार्थ आदर्श जीवनातून प्रेरणा घेतली होती. शिवराय त्यांना वंदनिय म्हणून गुरुस्थानी मानत होते. देहू येथे त्यांचा जन्मोत्सव साजरा होत असतांना आपण वारकरी ह्या भावनेने आपणही दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी त्यांचा जन्मोत्सव साजरा करून त्यांचे समाजकार्य समाजा पुढे सदैव तेवत ठेवले पाहिजे." यावेळी प्रमुख अतिथी महेश जवाहरमलाणी यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. अशोक गोरडे यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर संत तुकाराम महाराजांची आरती करण्यात येऊन वारकरी मंडळींना प्रसाद वितरीत करण्यात आला.