वाशिम: एकेकाळी आपल्या मधापेक्षाही गोड,सुमधूर,मंजूळ कंठाने गायन करणाऱ्या, श्रीक्षेत्र पंढरपूर वारकरी संप्रदायाच्या भजनसम्राज्ञी श्रीमती गोपीबाई चंद्रशेखर गुडलवार ह्या हरीभजनाकरीता पंचक्रोशीत सुप्रसिद्ध होत्या. त्यांच्या पतीच्या निधना नंतर मुलाचेही अकाली निधन झाले.परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.आता गोपीबाई ह्या नव्वदीच्या वार्धक्याकडे झुकल्यात.वार्धक्याने शरीर साथ देत नाही.मनमिळाऊ व प्रेमळ असलेल्या परंतु स्वतःही निराधार ठरलेल्या सुनबाई त्यांची सेवासुश्रूषा करीत असतात. सध्या त्यांना सांस्कृतिक विभागाचे वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन मिळते परंतु शासनाने नविन नियमानुसार प्रत्येक वृद्ध लोककलावंतानी महाकलासन्मान वेबसाईटवर मोबाईल लिंक असलेले आधारकार्ड ऑनलाईन नोदणी अत्यावश्यक केली.परंतु नव्वदीच्या वार्धक्यात झुकलेल्या गोपिबाई चंद्रशेखर गुडलवार यांचे हाताचे फिंगरप्रिन्ट किंवा शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्याचे स्कॅनिंग आधारकार्ड लिंक करण्याकरीता होऊ शकत नसल्याने वेबसाईटवर त्यांची नोंदणी कशी करावी ? त्यांचे आधार कार्ड पडताळणी कशी करावी ? असा प्रश्न पडला आहे. तसेच त्यांचे वय झालेले आहे. त्यामुळे आपणास तहहयात मानधन मिळावे अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. त्यामुळे शासनाने अशा जर्जर वयोग्रस्त लोककलावंताकरीता वेबसाईट वर आधार पडताळणीचे काही नियम व अटी शिथील करावेत अशी मागणी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोककलावंत संजय कडोळे यांनी केली आहे.