या पृथ्वीवर अनेक जीव जन्माला येतात. फक्त जीवंत राहण्यासाठी जगणे म्हणजे जगणे नव्हे. जीवन जगणे ही एक कला आहे. आपल्या शास्त्रात एकूण ६४ कला आहेत असे सांगितले जाते. प्राथमिक स्वरुपात ह्या कला अवगत असणे म्हणजे अंगभूत कलागुण असणे होय. मानवाच्या कलेप्रमाणे जीवन कला ही मनुष्याने निवडली पाहिजे. कोणाला मंजुळ बोलणे आवडते तर कोणाला वाघाप्रमाणे दरडावून बोलणे आवडते. आपल्या कलेने कुणाचे शोषण, पतन करत नाही तो मानव धन्य होय. कुणी आपल्या स्वार्थासाठी आपल्या अंगभूत कलांचा बाजारच करताना दिसतो. कला माणसाचे बळ वाढवते.
एक तरी असु दे अंगी कला ।
नाही तरी काय फुका जन्मला ।।धृ।।
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जीवनातील कलेला खूप महत्त्व दिले आहे. माणूस जन्माला आला तेव्हापासून कलेने जीवन जगणे हेच त्यांचे स्वप्न होते. महाराज म्हणतात की, "कला असे मानवाचे भूषण । परी पाहिजे जीवनाचे त्या स्मरण ।।" कला हेच मानवाचे भूषण आहे. मानवाच्या अंगी एक तरी कला असावी नाहीतर त्याचा जन्म वाया गेला, व्यर्थ गेला असे समजावे. मानव प्राणी जन्मला आणि नाहक मेला असे कधी होऊ नये. त्याच्या अंगी कला आहे म्हणून त्याला कोणीही ओळखतो नाहीतर त्याला कोणी पुसले नसते. कुणी श्रीमंत असो वा गरीब पण त्यांनी सुद्धा कलावान बनावे यातची सर्व मानवाचे शहाणपण सामावले आहे. राष्ट्रसंत म्हणतात की, "अहो ! जीवनाची एक तरी कला । असावे लागते मानवाला । तरीच तो मानव शोभला । नाही तरी कल्ला जीवनाचा ।।" कला असली तरच माणूस शोभून दिसतो नाहीतर त्याच्या जीवनाचा कल्ला झालाच म्हणून समजा. म्हणून आपला जन्म कलेशिवाय वाया जाऊ देऊ नका.
पशु-पक्षांची योनी जयाची ।
काय अपेक्षा धरा तयाची?।
परि तेही दाखवी चमक ती ।
लोक पाहाती त्यात गुणाला ।।
नाही तरी काय फुका जन्मला ।।१।।
पशु-पक्षांना जीवन जगण्याची कला असते. पशु जीवंतपणी व मेल्यावरही आपले कातडे देऊन माणसास उपकृत करतो. मग माणसाला कुशाग्र बुद्धी ईश्वराने दिली आहे. माणसाला जीवन जगण्याची कला असावी. पशु, पक्षी सुद्धा शत्रू आणि मित्राला ओळखण्याची कला त्यांच्यात आहे. या जगात पशु, पक्षी देखील उपाशी राहत नाहीत पण माणूस मात्र उपाशी का बरं राहतो. मनुष्याचे शरीर तर गुणाचे भांडार आहे. तुम्ही पशु, पक्षाची का अपेक्षा धरता? पक्षी उंच आकाशात भरारी मारुन आपलं अन्न शोधतात व आपल्या पिल्लांना सुद्धा घास भरवितात. पशु सुद्धा आपले जीवन कार्य पार पाडतात पशु, पक्षांसारखे आपण जगू नका. लोक हो, पशु, पक्षांच्या गुणाकडे का पाहता. आपण तर मनुष्य प्राणी आहात. मित्र हो ! अवकळा नसल्यास कला माणसाला श्रेष्ठ बनवते. कलेचे अधःपतन होता कामा नये. कारण कलेने देवत्व प्राप्त होते. म्हणून माणसाजवळ कला असावी अवकळा नसावी. आपला जन्म विनाकारण वाया घालवू नका. महाराज म्हणतात की, "कला मानवासी देव बनविते । परी अवकळा नसावी जरा तेथे । पूर्णताहि कलेनेच येते । अंगी आत्मबोध ।।"
पोट भरावे सगळे म्हणती ।
ऐसी जरी सगळ्यांची गणती ।
तरी गेली संस्कृतीची नीती ।
सेवा-धर्मचि जाई लयाला ।।
नाही तरी काय फुका जन्मला ।।२।।
आपले आयुष्य जगत असताना प्रत्येकांना पोट भरण्यासाठी आपल्या अंगी किमान एक तरी कला असणे गरजेचे आहे. सर्वच मनुष्य प्राण्याला जीवन जगण्याकरिता काम करणे हितावह आहे. खरचं कलेशिवाय जीवन किती कंटाळवाणे झाले असते. मनुष्याने कलाहीन जीवन जगू नये. एका संस्कृतीत हुशार मानली जाणारी वागणूक दुसऱ्या संस्कृतीतीत बुद्धीवान मानली जाऊ शकते. सभ्य जीवन जगण्यासाठी संस्कृती आपल्याला कल्पना, आदर्श आणि मूल्ये प्रदान करते. संस्कृती आहे म्हणून नीती आहे. आपण नीती गमावून बसू नका. नीती म्हणजे समाजात आणि कुटूंबात परस्पराशी वागण्याचे नियम. नीती म्हणजे सत्य प्रवृत्ती, सदाचरण, विवेक इत्यादी गुण अंतीम श्रेयाकडे नेणारा मार्ग आहे. आपल्या संस्कृतीची नीती गेली तर सेवा-धर्म लयाला जाऊ शकते. सेवा ही हिंदू धर्मातील सर्वात मोठे धर्म किंवा धार्मिक कर्तव्य मानले जाते. सेवा म्हणजे निस्वार्थ कृती. सेवा अशी करावी की, त्यात आपल्या आर्थिक लाभाची भावना नसावी. "सेवा हि परमो धर्मः !" मनुष्याचा मित्र धर्म आहे. धर्म मानवाला एकत्र आणतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, "धर्म लयाला जातो म्हणुनी । रामकृष्णहरी आला ।।" धर्म लयाला जाणे म्हणजे धर्म नष्ट होणे. धर्म म्हणजे दुसऱ्याला ईश्वराचा अंश मानून चांगले कर्म करणे होय. दुसऱ्याची मदत करणे म्हणजे धर्म. सेवकाने प्रामाणिक सेवा करावी. जो सेवेत अहंकार मिटून इतरांचे कल्याण व तन-मन, विचाराने इतरांचे मंगल इच्छितो आणि मान मिळो वा अपमान त्याची पर्वा करीत नाही. तीच खरी सेवा होय. म्हणूनच आपण आपला मनुष्य जन्म वाया घालवू नका.
जगणे मरणे सगळे जाणे ।
याने संपत नाही गाणे ।
पर-उपकाराविण का जीणे ।
तुकड्यादास म्हणे सगळ्याला ।।
नाही तरी काय फुका जन्मला?।३।।
जगणे म्हणजे आपल्या जीवनाचा मार्ग आणि मरणे म्हणजे जीवनाचा अंत होय. जगणे आणि मरणे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. मृत्यूला अंत म्हणून पाहिले जात नाही तर एक संक्रमण किंवा परिवर्तन म्हणून पाहिजे जाते. आपलं जगणे आणि मरण्याचं रडगाणं कधीच संपणार नाही. आपण मरण्यासाठी जगू नका तर देवाची सेवा करण्यासाठी जगा. पर-उपकाराविण जीवन जगू नका. पर-उपकार म्हणजे परोपकार. परोपकार म्हणजे निस्वार्थ भावनेने मदत करणे, पैसे दान करणे, स्वयंसेवा करणे, शत्रूलाही मदत करणे. परतफेडीची अपेक्षा न ठेवता दुसऱ्यांना मदत करणे. मनात कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता एखाद्या व्यक्तीला निर्मळ मनाने केलेली मदत किंवा दान याला परोपकार करणे म्हणतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सगळ्यांना सांगतात की, हा मनुष्य जन्म महत् प्रयासाने मिळाला आहे, तो वाया घालवू नका.
बोधः- आपल्या करिताच आपण जीवंत राहणे म्हणजे किड्या, माकोड्या प्रमाणे आपले मनुष्यत्व समजणे होय आणि परोपकाराकरिता जगणे म्हणजेच खरे मानव्याकरिता जगणे होय. देवळात जाऊन पूजापाठ करण्यात वेळ घालवणारी बरीच मंडळी आहेत पण त्याला परमार्थ, अध्यात्म म्हणता येणार नाही. स्वतः आंत झाकून माणसातला ईश्वर शोधला पाहिजे. परोपकारात परमार्थ ओतप्रोत भरलेला आहे.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....