पिंपरी चिंचवडमधून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. मुंबई-पुणे हायवेलगत असलेली मोठी होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे खाली कोसळली.
या घटनेत पाच जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये ही घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बचावासाठी काही नागरिकांना होर्डिंगचा आधार घेतला.
मात्र वादळामुळे अचानक हे होर्डिंग पडल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभाग क्रेनच्या माध्यमातून होर्डिंग बाजूला करण्याचं काम सुरु आहे. होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे.
ज्या ठिकाणी हे होर्डिंग आहे त्या होर्डिंगच्या खाली एक टायर पंक्चरचे दुकान होतं. पाऊस आला त्यावेळी त्या टायर पंक्चरच्या दुकानांमध्ये सात-आठ जण थांबून होते. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग टायर पंक्चरच्या दुकानावर पडली आणि त्या दुकानांमध्ये उभे असलेल्या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.