कारंजा (लाड) : स्थानिक कारंजा नगरी म्हणजे आदीअनादी काळात करंजऋषींनी स्थापन केलेली पौराणीक,धार्मिक,आध्यात्मिक नगरी असून,मातृभक्तांच्या श्री कामाक्षा देवीचे शक्ती पिठ,दत्तउपासकांच्या श्री.नृसिह सरस्वती स्वामींची जन्मभूमी, जैन समुदायाची तिर्थक्षेत्रे आणि श्री पद्मावती देवीच्या काष्टासंघ मंदिराची पावन भूमी म्हणून देश विदेशात प्रसिद्ध आहे.छत्रपती शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेले हे शहर असून, एकेकाळी सुवर्णनगरी असलेल्या या शहरातील संघई यांनी कस्तुरीने महाल बांधल्याचा आणि येथील काण्णव बंगल्याची प्रतिकृती पाहून विदेशातील वास्तुविशारदांनी आश्चर्य व्यक्त केल्याचा येथील इतिहास असून, कापूस पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात, भारतातीलच पाहिली नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली बाजारपेठ म्हणून कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाल्याचा सुवर्णक्षरांकित इतिहास देखील आहे.परंतु राज्याच्या निर्मितीनंतर मात्र सदरहू शहर विकासा पासून आकांक्षित राहीलेले आहे. येथील कापूस उत्पादन कमी झाल्यामुळे पूर्वीचे कापसाचे जीन बंद झाले. त्यामुळे मजूर कामगारांच्या हाताला कामधंदा नाही.शहरात तिर्थक्षेत्र व पर्यटनाला येणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांसाठी सोयी सुविधा नाहीत. शहरात औद्योगिक वसाहत नसल्याने उद्योग कारखाने नाहीत त्यामुळे शहरात रोजगाराची साधने नाहीत.त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग समाजसेवक तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी अनेकवेळा शासनाकडे कारंजा शहराला, अ श्रेणी तिर्थक्षेत्राचा दर्जा देवून या शहराचा शेगाव-पंढरपूर च्या धर्तीवर विकास आराखडा तयार करून विकास करण्याची आणि सोहोळ काळवीट अभयारण्य पर्यटनासाठी खुले करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शहरात व ग्रामिण भागातील नागरीकांना लघुव्यवसाय सहजपणे उपलब्ध होणार आहेत.तसेच तालुक्यातील विद्यार्थ्याकरीता उच्च पदवीत्तर शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होणे आणि औद्योगीक वसाहती होऊन शेती उत्पादनावर प्रक्रिया करणारे व इतर उद्योग कारखाने सुरु होणे अत्यावश्यक आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत कारंजा शहरातील स्थानिक महिला आमदार श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके ह्या प्रचंड मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत. श्रीमती सईताई डहाके ह्या धार्मिक,आध्यात्मिक, अभ्यासू व अनुभवी असून श्री कामाक्षा देवी आणि श्री नृसिह सरस्वती स्वामींच्या भक्त परिवारातील असल्यामुळे कारंजेकरांच्या विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या असून आमदार ताईसाहेब यांनी, जैनांची काशी आणि गुरुमाऊलीची जन्मभूमी असलेल्या कारंजा नगरीला, राज्य शासनाकडून अ श्रेणी तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देऊन कारंजा नगरीचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून त्या अंतर्गत येथील विकास करण्याची अपेक्षा व मागणी समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.