वाशिम :- जिल्ह्यातील काही यात्रेकरू तीर्थाठनावरून परतीचा प्रवास करीत असताना बस नादुरुस्त झाल्याने बारा तास अडकलेल्या या प्रवाशांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी अमोलभाऊ पाटणकर यांच्या सहकार्याने कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे सुखरूप आपापल्या गावी पोहोचणार आहेत.
मानोरा, मंगरूळनाथ, कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागासह वाशिम शहरातील नागरिक बालाजी, कन्याकुमारी आणि दक्षिणेकडील विविध धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी गत महिण्याच्या २४ तारखेला खाजगी आराम बस द्वारे तीर्थाटनाला गेले होते.
खापरदरी, सावरगाव कान्होबा, साळंबी, पिंपरी फॉरेस्ट, पिंपळगाव आदी गावातील तथा मंगरूळनाथ,कारंजा, वाशिम या शहरातील तब्बल ४६ तीर्थयात्रेकरूंच्या परतीच्या प्रवासादरम्यान कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील बेळगाव शहरा नजीक या यात्रेकरूंची खाजगी आराम बस रात्री बारा वाजता नादुरुस्त झाली होती.
खाजगी बस दुरुस्त होण्याची चिन्हे दिसत नसताना सकाळी ११ वाजता यातीलच एक प्रवासी सुधाकर चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी अमोलभाऊ पाटणकर यांनी परिस्थितीची माहिती देताच पाटणकर यांनी तातडीने सूत्रे हलविली.
कर्नाटक प्रशासनातील स्थानिक शहरातील उपविभागीय अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, तहसीलदार तथा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अडकलेल्या प्रवाशांची भेट घेऊन कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस लागलीच उपलब्ध करून देत वाशिम जिल्ह्यामध्ये या यात्रेकरूंना मार्गस्थ केले.