वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : कारंजा तालुक्यातील पसरणी येथे 16 जून रोजी " शासन आपल्या दारी " या उपक्रमाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात 25 घरकुल लाभार्थ्यांना गृहप्रवेशाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.यावेळी पंचायत समिती सभापती बापूजी देशमुख, जिल्हा परिषद सदस्य दत्ता तुरक, दिनेश वाडेकर,गटविकास अधिकारी शालिकराम पडघन,तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी व पसरणी सरपंच चांद कासम गारवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
घर हे प्रत्येकाच्या आयुष्याचे स्वप्न असते.घरकुल योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे स्वप्न सरकारने घरकुलाचा लाभार्थ्यांना गृहप्रवेशाचे प्रमाणपत्र देऊन साकारले.यावेळी लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गृहप्रवेशाचे प्रमाणपत्र वाटप करतांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
लाभार्थ्यांचा घरकुलाचा गृहप्रवेश समारंभ थाटात साजरा करण्यात आला. " शासन आपल्या दारी " या उपक्रमांतर्गत उपस्थित ग्रामस्थ आणि लाभार्थ्यांना विविध योजनेची माहिती सुद्धा देण्यात आली.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र धामणी यांच्यामार्फत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत कृषी विभागाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली.तसेच पंचायत समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती देण्यात आली.
तसेच उपस्थित ग्रामस्थांना या वर्षांमध्ये विविध योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले.ज्या योजनेकरीता जी कागदपत्रे पाहिजे आहे, ती कागदपत्रे तात्काळ पंचायत समितीला किंवा ज्या विभागाच्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे,त्या विभागाकडे अर्जासोबत सादर करण्यात यावी अशा सूचना उपस्थित सर्वांना देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला पसरणी गावातील ग्रामपंचायतचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.