शाळेत कर्तव्यावर जात असताना दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी धारदाार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्यानंतर पेट्रोल टाकून जाळल्याने एका ५४ वर्षीय शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज, सकाळी १० ते १०.३० वाजता दरम्यान घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरातील शेलू फाटा परिसरात राहणारे दिलीप धोंडुजी सोनुने (वय ५४) हे बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ९ आटोंबर रोजी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे आपली मोटारसायकल क्रमांक एम. एच. ३७ वाय. १४३८ घेऊन ते बोरगावला जाण्यासाठी निघाले असता वाटेत मालेगांव शहरापासून ४ किलोमीटर अंतरावर कोल्ही गावाजवळील रस्त्यावर दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. डोयात धारदार शस्त्राने जोरदार प्रहार केल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दिलीप सोनुने यांच्या शरीरावर हल्लेखोरांनी सोबत आणलेले पेट्रोल टाकून पेटवून दिले. रस्त्याने येणारे जाणारे नागरिकही या घटनेमुळे भयभीत झाले होते. प्रत्यक्षदर्शी पैकी कुणीतरी १०८ रुग्णवाहीकेला व डायल ११२ वर फोन करताच जउळका रेल्वे चे ठाणेदार प्रदीपकुमार राठोड, पोहेकॉ किशोर वानखेडे, पंजाब घुगे, अरविंद सोनोने, पोकॉ दिपक कावरखे, अमोल पाटील, अमोल गिर्हे, नापोकॉ सुनील काळदाते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी दिलीप सोनुने यांना डॉ. शक्ती शेवाळे व चालक राहुल सांगळे यांनी रुग्णवाहीकेद्वारे वाशीमच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले जेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेमुळे परिसरात कमालीची दहशत पसरली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, हल्लेखोरांपर्यंत पोहचण्यासाठी हल्ल्याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. वाशीम येथील फॉरेन्सिक एस्पर्टनी घटनास्थळी पोहोचून बारकाईने घटनास्थळाचे निरिक्षण केले आहे.