शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार,अंत्यसंस्कारासाठी हजारोंचा जनसागर,अमर रहे च्या घोषणांनी दणाणला परिसर !
कामरगाव (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : कारंजा तालुक्यातील बेंबळा येथील रहिवासी असलेले आणि सी आर पी एफ मध्ये कार्यरत असलेले जवान देवेंद्र शामराव वानखडे यांना गुरुवारी 27 जुलैला वीरमरण आले ते त्रिपुरा येथे कर्तव्य बजावीत होते.देवेंद्र वानखडे हे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांनी 29 वर्ष देश सेवा केली.अशातच त्रिपुरा येथे कर्तव्य बजावीत असताना अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली आणि तेथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली अशातच शुक्रवारी दुपारी दुपारी : 01 : 00 वाजता त्यांच्या जन्मगावी बेंबळा येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोचा जनसागर उसळला होता.उपस्थित प्रत्येकाने जड अंतकरणाने त्यांना निरोप दिला.जवान देवेंद्र वानखडे यांचे पार्थिव गावात दाखल होतात अनेकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली त्यानंतर हजारोंच्या उपस्थितीत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी जवान देवेंद्र वानखडे अमर रहे ! अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता
बेंबळा येथील स्मशानभूमी जवळ त्यांचा मोठा मुलगा अमित यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी त्यांच्या बटालियन व पोलिसांकडून हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली.या प्रसंगी कर्तव्यदक्ष तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी,धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश इंगळे , पी.एस.आय.अंकुश वडतकर यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी व इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. हृदय हेलावून सोडणाऱ्या या जवान देवेंद्र वानखडे यांच्या मृत्युच्या घटनेनंतर त्यांच्या मृत्युपशात त्यांच्या मागे आई पत्नी दोन मुले दोन भाऊ व दोन बहिणी असा आप्त परिवार आहे एक कर्तव्यनिष्ठ सैनिक म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे असे वृत्त आमचे प्रातिनिधी उल्हास ठाकरे यांनी कळविले आहे.