कारंजेकरांच्या आणि गवळी समाजाच्या शिरपेचात खोवल्या गेला आकिब शेकुवाले यांच्या अधिकारी पदामुळे मानाचा तुरा.
कारंजा (लाड) (संपादक संजय कडोळे) : कारंजा शहरातील गवळीपुरा येथील आकिब मोहम्मद शेकुवाले यांची सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडिट ऑफिसर,प्रथम श्रेणी पदावर निवड झाली असून त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कारंजा शहर व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्था आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन) मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेत देशभरातून तब्बल चार लाख उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता.काटेकोर निवड प्रक्रियेतून केवळ एक हजार उमेदवारांची अंतिम निवड झाली असून त्यात कारंजा येथील आकिब शेकुवाले यांनी आपले नाव तेजाने उजळविले आहे.या यशामुळे त्यांच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे फलित समाजासमोर आले आहे.
आकिब शेकुवाले यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्य ठेवत कृषी शाखेत पदवी (बीएससी ऍग्रीकल्चर) मिळवल्यानंतर एम.ए. (अर्थशास्त्र) पर्यंतचे उच्च शिक्षण घेतले. लहानपणापासूनच अभ्यासात मन लावणारे आणि प्रगतीशील वृत्तीचे असलेल्या आकिब यांनी आपल्या चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील कठीण स्पर्धेत यश मिळवून दाखवले आहे.
त्यांच्या या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. आई–वडिलांनी नेहमीच शिक्षणाला प्राधान्य देत आकिब यांना योग्य ते मार्गदर्शन केले. घरातील साधेपणा,कष्टाळूपणा आणि शिस्तबद्ध वातावरणामुळे आकिब यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मकता रुजली. कुटुंबाच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच त्यांनी कठोर परिश्रम करून हे यश मिळवले असल्याचे त्यांचे जवळचे नातेवाईक सांगतात.
या कामगिरीमुळे शेकुवाले परिवारासह कारंजा शहर व समाजात अभिमानाची लाट उसळली आहे. विविध मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांनी आकिब यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.आकिब यांचे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण कारंजा शहरासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.