कारंजा (लाड) : संजय गांधी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना सामाजिक विभागाकडून दरमहा पंधराशे रुपये अनुदान देण्यात येते.अशा अनुदानावरच शेकडो वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळी,विधवा - घटस्फोटित,परित्यक्त्या महिला आणि अंध,मतिमंद इ. दिव्यांग व्यक्तींचा उदरनिर्वाह अवलंबून असतो.पूर्वी जिल्हाधिकाऱ्यामार्फत संबधीत तहसिल कार्यालयाकडून निराधारांना अनुदान मिळत असे परंतु विद्यमान शासनाने त्यामध्ये सुधारणा करून आता थेट हस्तांतरण प्रणाली डी.बी.टी. द्वारे निराधारांच्या बँकखात्यात आधारकार्ड प्रणालीने अनुदान वितरण सुरु केले आहे.मात्र आता उत्पन्नाच्या पडताळणी करीता आणि संबधीत निराधारांचे खाते अद्यावत करण्यात येणार असून,त्यासाठी संबधीत निराधारांनी (तलाठी) पटवाऱ्या मार्फत उत्पन्नाचे दाखले सेतुकेन्द्रातून काढून संजय गांधी अनुदान विभाग तहसिल कार्यालयात जमा करण्यास आणि हयात दाखले (जीवन प्रमाणपत्र) आपआपल्या बँकेत देण्याचे कळविण्यात आले आहे.