पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या चारही जिल्ह्यांचा संपूर्ण भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या भागाला झाडीपट्टी असं संबोधण्यात येतं. या झाडीपट्टी भागातील रहिवाशांचं नाटकांवर अतोनात प्रेम. तेथील मूळ व्यवसाय हा शेतीचा. तेव्हा शेतीचा हंगाम संपला की तिथे नाटकांचा मौसम सुरू होतो. या काळात येथील आबालवृद्धांच्या नाट्यप्रेमाला उधाण येतं. झाडीपट्टी भागातील ही नाट्यचळवळ ‘झाडीपट्टी रंगभूमी’ या नावाने प्रसिद्ध आहे. या रंगभूमीला १२५ ते १५० वर्षांची परंपरा आहे हे विशेष.
भारतीय संस्कृतित जेवढं महत्त्व सणांना आहे तेवढंच महत्त्व झाडीपट्टीत नाटकांना आहे. पूर्वीपासूनच शेतीचा हंगाम संपला की दिवसा बैलांच्या शर्यती (ज्याला स्थानिक लोक शंकरपाट म्हणतात) आणि रात्री नाटक असा कार्यक्रम पुढील पाच महिने म्हणजेच ऑक्टोबर ते मार्चपर्यंत चालतो. या काळात दिवसभराची कामं आटपली की संध्याकाळी गावकरी पारांवर मोकळ्या मैदानात जमून यंदा कुठलं नाटक करायचं, कोणी कुठली भूमिका करायची, बॅकस्टेजचं काम कुणी सांभाळायचं हे आखतात. नाटकाशी संबंधित कुठलंही काम या लोकांसाठी गौण नसतं, हे विशेष. प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग हा रात्रभर चालतो आणि नाटक कुठलंही असलं तरी त्यात गाणी आणि लावण्या असायलाच पाहिजेत हा इथला अलिखित नियम.
गावाबाहेरील मोकळी जागा पाहून तिथे प्रेक्षकांना बसण्यासाठी एक मोठा आयताकृती खड्डा खणून त्यातून निघालेली माती खड्ड्यासमोर रचून २० ते ३० फूट उंच असा रंगमंच केला जातो. प्रयोगाच्यावेळी त्या जागेवर लाकडी फळ्यांच्या साहाय्याने तात्पुरता रंगमंच उभारला जातो. अशा ओपन थिएटरमध्ये रंगणार्या नाट्यप्रयोगाचा आस्वाद एकावेळी तीन ते चार हजार प्रेक्षक घेऊ शकतात.
अशा या आगळ्यावेगळ्या रंगभूमीला नाट्यशास्त्राचे कुठलेच नियम लागू नाहीत. आजूबाजूच्या गावातील नटमंडळी एकत्र येऊन नाट्यप्रयोग करत असल्याने सलग तालमींना वेळ नसतो. त्यामुळे संवाद पाठ करण्याऐवजी प्रॉम्पटरकडून संवाद ऐकून अभिनय सादर करण्यावर कलाकारांचा भर असतो. त्यामुळे कलाकारांएवढाच प्रॉम्पटरचा रोलही महत्त्वाचा. प्रयोगाच्यावेळी हार्मोनियम वा ऑर्गन वाजवून प्रॉम्पटरचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाते. साऊंड सिस्टीमची रचनाही आगळीवेगळी असते. प्रयोगाच्यावेळी रंगमंचाच्या मधोमध एक पॉवरफूल माईक लावला जातो आणि पात्र प्रत्येकवेळी त्याच्यासमोर येऊन संवाद म्हणतात.
या रंगभूमीचं आणखी एक महत्त्वाचं अंग म्हणजे पाच महिन्याच्या काळात नाट्यप्रयोगांसाठी होणारी आर्थिक उलाढाल. आर्थिक निकषांवर पाहिल्यास झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकं मुंबई पुण्याच्या व्यावसायिक नाटकांच्या तोडीसतोड आहेत. या रंगभूमीवरील नाटकांच्या एका सर्वेक्षणाच्या निकालानुसार झाडीपट्टी रंगभूमी हा सांस्कृतिक व्यवसाय असून या व्यवसायात १० हजार कलावंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कार्यरत आहेत आणि या व्यवसायात पाच महिन्यांच्या कालावधित साधारणतः २५ करोड रुपयांची उलाढाल होते. यावरून झाडीपट्टी रंगभूमी आर्थिकदृष्ट्या किती समृद्ध आहे याची कल्पना येते. या रंगभूमीच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. झाडीपट्टीच्या या चार ते पाच महिन्यांच्या सिझनवर कलावंत, मंडपवाले, बॅकस्टेज कलाकार, तबलजी, पेटीवाले, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, वेशभूषाकार, जाहिरातदार ते थिएटरबाहेरील चहाची टपरी, दुकानदार असे अनेकजण आपला गुजारा करतात. झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांच्या प्रयोगाला ५० हजार ते दीड लाख रुपयांची विक्रमी तिकीट विक्री होते.
गेल्या १२५ ते १५० वर्षांच्या कालावधित झाडीपट्टी रंगभूमीत अमूलाग्र बदल झालाय. पूर्वीच्या संगीत नाटकांची जागा गद्य नाटकांनी घेतलीय. या रंगभूमीच्या प्रचंड आर्थिक उलाढालीमुळे मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील व्यावसायिक, कलाकारांनीही इथे प्रवेश केलाय. किंबहुना आपल्या कंपनीची पत वाढावी म्हणून शहरातील व्यावसायिक कलाकारांना वाट्टेल तेवढे पैसे मोजून आपल्या कंपनीत ओढण्याची चढाओढ इथे लागलली असते. त्यामुळे व्यावसायिक नाट्य कलाकारही पाच महिने इथे तळ ठोकून रहातात. पण यामुळे स्थानिक कला आणि कलाकारांची उपेक्षा होऊ लागलीय.
असं असलं तरीही नॉनस्टॉप १०० ते १५० प्रयोग करणारे कलाकार, प्रॉम्पटरच्या मदतीने हजारो प्रेक्षकांसमोर बेमालूम अभिनय करणारी नटमंडळी आणि गावागावातून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांच्या कलेला उत्स्फूर्त दाद देणारे नाट्यवेडे प्रेक्षक हीच झाडीपट्टी रंगभूमीची खरी ओळख आहे!
आपल्या प्रतिक्रिया द्या....