कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): गेल्या जुलै 2023 पासून, कारंजासह संपूर्ण जिल्हयातील विधवा,घटस्फोटित, परित्यक्त्या महिला, दिव्यांग व दुर्धरग्रस्त,निराधार ज्येष्ठ नागरिकांचे अनुदान रखडलेले होते.व त्याकरीता वेळोवेळी कारंजा येथील दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी गेल्या दोन महिन्यापासून,मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस,ना.अजित पवार आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव सुमितजी भांगे (भाप्रसे) यांचेशी रजिष्टर पत्राद्वारे सविनय निवेदन देवून, "दसरा-दिपावलीच्या सणासुदीच्या दिवसात निराधाराच्या वेदना जाणून, त्यांनाही गोडाधोडाचे खायला मिळावे आणि शासनाने त्यांचीही दिपावली साजरी करावी."अशी गळ घातली होती. अखेरीस शासनाने दखल घेऊन,राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीतील अनुदान पाठवीले असल्याचे कळवीले.प्राप्त झालेले अनुदान जिल्हाधिकारी कार्यालय,वाशिम यांच्याकडून सर्व तहसील कार्यालयांना लाभार्थी संख्येनुसार व त्यांनी केलेल्या मागणीनुसार वितरित करण्यात आले आहे.
मात्र केंद्र पुरस्कृत योजनेसाठी अद्यापही अनुदान प्राप्त झालेले नाही.अनुदान प्राप्त होताच त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्वसाधारण 21 हजार 603 लाभार्थ्यांना,संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुसूचित जातीच्या 7382 लाभार्थ्यांना सप्टेंबर 2023 पर्यंतचे,संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुसूचित जमातीच्या 1934 लाभार्थ्यांना ऑगस्टपर्यंतचे,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या 35 हजार 7 सर्वसाधारण लाभार्थ्यांना सप्टेंबरपर्यंतचे,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अनुसूचित जातीच्या 12 हजार 77 लाभार्थ्यांना सप्टेंबरपर्यंतचे, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमातीच्या 2166 लाभार्थ्यांना सप्टेंबरपर्यंतचे अनुदान वाटप पाठविण्यात आले आहे.जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत 95 हजार 942 लाभार्थी असल्याची माहिती मिळाली असून,लवकरच निराधार लाभार्थ्याच्या खात्यात थेट अनुदान मिळणार असल्याचे दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळविले आहे.