कारंजा : अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव हे आपल्या निष्काम, निःस्वार्थ, परोपकारी, सेवाव्रती उपक्रमामुळे अखंड भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात "आदर्श तिर्थक्षेत्र" म्हणून ओळखले जाते. संपूर्ण जगभरात श्रीक्षेत्र शेगावच्या श्री गजानन माऊलीचे करोडो वारकरी भक्त असून त्यांचेकडून गावोगावी, खेडोपाडी, घरोघरी, मनामनात "श्री"चा प्रगट दिनोत्सव प्रचंड आनंदोत्साहात साजरा करण्यात येवून आध्यात्मिक विचारांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येत असतात.आपल्या सर्वधर्मिय समभाव , राष्ट्रिय एकात्मकता, आध्यात्मिकता आणि धार्मिकतेचे माहेरघर असलेल्या कारंजा नगरीतही प्रत्येक मोहल्ल्यातील वसाहतीत ठिक ठिकाणी "श्री" ची लहान मोठी शेकडो मंदिरे असून, अनेक ठिकाणी श्रीमद् भागवत कथा, किर्तन, प्रवचन, अन्नदानाचे मोठमोठे भंडारे आयोजीत करण्यात आलेले असून, अनेक वसाहतीतील मंदिरांमधून "श्री" ची पालखी दिंडी मिरवणूक सुध्दा निघत असते. दोन वर्षापूर्वी अकस्मात आलेल्या कोरोना महामारी मधून आपण सुखरूपपणे बाहेर पडल्यामुळे, मागील वर्षापासून कारंजा शहरातील "श्री"भाविकांचा उत्साह ओसंडून वहात आहे. त्या पार्श्वभूमिवर श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त, कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पो.नि.दिनेशचंद्र शुक्ला यांनी समस्त कारंजेकर "श्री" भक्तांना प्रगटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या असून, "श्री"च्या सर्व भाविक भक्तांनी आणि कारंजेकरांनी "श्रीं" चा प्रगटदिनोत्सव साजरा करतांना शेगाव संस्थानचे अनुकरण करून निःस्वार्थ पणे,शांती, सयंम, शिस्त ठेवून आणि महत्वाचे म्हणजे शासनाच्या निर्देशाचे व कायद्याचे भान ठेवून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.