कारंजा (लाड) : साधारणत, मे महिन्यात अक्षयतृतियेनंतर आकाशात ढग जमून,ऊन सावलीचा खेळ सुरू होऊन वातावरण बदल होत असतो. त्याचप्रमाणे मृगनक्षत्रा पूर्वीच रोहीणीचा पाऊस दस्तक देत असतो.रोहीणीच्या पाऊसाने मान्सूनचे संकेत मिळून, आमचा बळीराजा पेरणी करीता बी बीयाणे खताचा भरणा करून, पेरणीच्या तयारीला लागतो व मृगनक्षत्रातच पेरणी करीत असतो. परंतुवर्षी मात्र संपूर्ण वसुंधरेसह, प्राणीमात्राला प्रखर उष्णतेला सामोरा जावे लागले जून महिन्याचा उत्तरार्ध सुरु झालेला असला तरी यंदा उष्णतेचा प्रभाव कायमच असून, दि २२ जून उगवलेला असतांनाही अद्यापपर्यंत मान्सूनच्या पावसाचा मागमूसही दिसत नाही. त्यामुळे जर जुलै महिन्याच्या सुरुवाती पर्यंत जर मान्सूनचा पाऊसच आला नाही तर बळीराजावर या हंगामात महासंकट उदभवू शकते. त्यामुळे परिणामी शेतकऱ्यांना प्रमुख पिकांची पेरणी टाळावी लागणार असून, कमी पावसात व कमी कालावधीत येणाऱ्या पिकवाणांचीच निवड करावी लागणार आहे.त्यामुळे अशा बिकट आपात्कालिन परिस्थितीत शेतकऱ्यांना,कृषी संशोधकाचा सल्ला घ्यावा लागणार आहे. यंदा हवामान तज्ञ पंजाब डख यांचेसह सर्वच मातब्बर हवामान संशोधक व वेधशाळेचे अंदाज निष्फळ ठरल्याचे सिद्ध झाले आहे. मागील वर्षाच्या हंगामात अतिवृष्टीने हातचा गेलेल्या हंगामाची भरपाई या हंगामात होईल असा आशावाद बाळगून असलेल्या शेतकर्याची यंदा घोर निराशा होत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीच्या मान्सूनपूर्व तयारीसाठी मिळेल त्या मार्गाने, बॅकाचे कर्ज, सावकाराकडून व्याजाची रक्कम घेऊन बी बियाने घेऊन, पेरणीची तयारी पूर्ण केलेली होती मात्र ऐन पावसाळ्यात प्रखर उन्हाळा सुरु असून,अद्यापपावेतो मान्सूनचा पाऊस येत नसल्याने शेतकरी राजाचे अवसान गळून चालले असून सर्वत्र नैराश्याचे वातावरण तयार होत आहे. शेतकरी राजाला यावर्षी दुष्काळाचा सामना करावा लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून आता कृषी संशोधक त्यांना सर्वत्र सोयाबीन, तूर वाण,तिळ आणि सूर्यफूल पेरणीचा सल्ला देऊ शकतात. असा अंदाज आहे. खरीपातील लागवडीचा कालावधी निघून जात असल्याने, सर्वांनाच चातका प्रमाणे पावसाची प्रतिक्षा लागलेली असून यंदा 2024 च्या उन्हाळ्यात,पिण्याच्या पाण्याचा हाहाकार होण्याची शक्यता असल्याने ,दुष्काळाच्या सावटाने पिण्याचे पाणी व अन्नधान्याच्या टंचाईच्या भितीने नागरीक भयग्रस्त होत आहेत.त्यामुळे यंदा आज आणि आत्ता पासून, पिण्याच्या पाण्याचे साठे, विहीरी, जलाशये (धरणे) केवळ पिण्याकरीता राखून ठेवावी लागणार असून,सर्वसामान्य जनतेला दुष्काळामुळे पाणीटंचाई, अन्नधान्य टंचाई,बेरोजगारी व प्रचंड महागाईचा सामना करावा लागणार आहे.त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने, प्रत्येक सर्वसामान्य माणसाने त्या दृष्टीने नियोजन करून, उद्भवणाऱ्या संकटाशी मुकाबला करण्यास तयार राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे असे वृत्त सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी कळवीले आहे.