अकोला : श्री. संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने येत्या ११ मे रोजी संतनगरी शेगाव येथे संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असून या अधिवेशनाला देशभरातून समाजबांधवांची उपस्थिती राहणार असून विशेष म्हणजे नेपाळ येथील तेली समाजाचे आमदार आणि खासदार सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष घाटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना सुभाष घाटे म्हणाले की, सदर अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार असून यामध्ये समाजाचे एकत्रीकरण, आरक्षण यांवर चर्चा करण्यात येणार आहे. ओबीसी गटात तेली समाजाचा वाटा हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे तरीही मात्र समाजाला डावलल्या जात असल्याची खंत आहे. या अधिवेशनात प्रारंभी समाजाचे दिवंगत नेते विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर आणि पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तर मागील काही काळात तेली समाजाच्या हितार्थ सरकारने काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत, जसे की तेलघाणी बोर्डाचे निर्माण, संताजी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, श्री. संत शिरोमणी जगदाळे महाराज संस्थानला ' ब ' वर्ग दर्जा दिला असून त्याठिकाणी स्मारकाची निर्मिती करण्यात येत असून त्यासाठी पहिला टप्पा म्हणून ६८ कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आला आहे. या सर्व निर्णयांना अनुसरून सरकारचे अभिनंदन करण्यात येणार असून याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे. तर गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित असलेल्या निवडणुका आता येणाऱ्या चार महिन्यात घेण्याचा जो निर्वाळा दिला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन आणि आभार मानले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला प्रवीण झापर्डे, महेंद्र अकोटकर, ललित भगत, प्रा. प्रकाश डवले, ठाकुरदास चौधरी, योगेश गोतमारे, अनिल मालगे, ॲड. देवाशिष काकड, गोपाल झापर्डे, राहुल धनभर, अरुण टिकले, रमेश गोतमारे, प्रशांत सेवतकर, नितीन वानखेडे, दीपक इचे, दिलीप क्षीरसागर, राम जांबे, ज्ञानेश्वर रायपूरे, विनोद नालट आदी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....