राज्यातील करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत गेले काही दिवस घट होताना दिसत असून आज मोठी घट झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज शनिवारी फक्त ९७ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. विशेष म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर राज्यातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या खाली घसरली आहे. यापूर्वी राज्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोना रुग्णसंख्या शंभरच्या खाली आलेली होती.
राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख २३ हजार ००५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ८९ लाख ०९ हजार ११५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ७२ हजार ३०० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण ०९.९८ टक्के इतके आहे.