असे म्हटले जाते की, ३३ कोटी देव आहेत पण ३३ कोटी हा शद्ब ३३ प्रकारच्या देवांना दर्शविण्यासाठी वापरला जातो. हे ३३ प्रकारचे देव म्हणजे ८ वसू, ११ रूद्र, १२ आदित्य, इंद्र आणि प्रजापती होय. देव आणि परमेश्वर किंवा भगवंत यामध्ये फरक आहे. देव हा सामान्यतः नैसर्गिक शक्ती किंवा देवाचे रुप दर्शवितो. भगवंत किंवा परमेश्वर हा सर्वौच्च, सर्वव्यापी आणि शक्तीमान देव आहे. भगवंत हे जगाचे निर्माता आणि नियामक आहेत. तो सर्व शक्तीमान आणि सर्वज्ञ आहे. इंद्रदेव पाऊस आणि विज यासारख्या नैसर्गिक शक्तीचे प्रतिक आहे. परमेश्वर सर्वत्र एकच आहे. त्याचे नावे वेगवेगळे आहे. सर्व कार्य परमेश्वर पाहतो आणि झाडाचे पान त्याचे शिवाय हलत नाही. जसा परमेश्वर एकच आहे तसेच तुम्ही सुद्धा एकच आहे. तुम्हाला कुणी दादा, काका, मामा, बाबा, पत्नी पतीदेव मानते. उदाः- एका शाळेच्या शिक्षकाने देव नाही या विषयावर एक तास व्याख्यान दिले. ऐकणारे एकटक लावून ऐकत होते. त्या शिक्षकाला विचारले, तू एक तास लोकांना एका जागेवरुन उठू दिले नाही. यावर तो शिक्षक म्हणाला, यात काय नवल नाही ही तर देवाची कृपा आहे. अशा माणसाला काय बोलावे. देव नाही म्हणतो आणि देवाची कृपा आहे म्हणतो. राष्ट्रसंत म्हणतात, "सारी दुनिया का तूही करणधार है । बिना तेरे ना किसीको लगापार है ।।" हा परमेश्वर सर्व काही करतो. तो जीवन उद्धारतो. आपल्या प्राणाचा सरदार तोच आहे. त्याचेमुळेच सर्व तारे, ग्रह एका ठिकाणी उभे आहेत. त्याचीच सत्ता आहे की, सागराचे पाणी वाढत नाही.
प्रभु ! सांग तुझ्यामध्ये काय असे?
माझे मन तुज पाहण्यासी लालसे ।।धृ।।
प्रभू म्हणजे स्वामी, मालक, परमेश्वर किंवा भगवंत. परमेश्वर सर्वत्र आणि सर्वकाही मध्ये उपस्थित असतो. परमेश्वर सर्व काही जाणतो आणि अनुभवतो. परमेश्वर आपल्या बरोबर प्रेम आणि दयाळूपणे वागतो. परमेश्वर शांती आणि समतोल टिकवून ठेवतो. परमेश्वरच आपल्या जीवनात आशा, मार्गदर्शन आणि शांतता देतो. म्हणून तर त्याच्या दर्शनाची व्याकुळता किंवा इच्छा आपल्या मनात होते. संत एकनाथ महाराज म्हणतात, "देवा माझे मन लागो तुझे चरणी । संसार व्यसनी पडो नेदी ।" देवाचे चरणावर माझे मन लागो. संसार किंवा व्यसनात मन न जावो. संत समागम घडून तुझे नामस्मरण नित्य घडो.
कितीतरी भक्तांनी तुजसाठी, आपुले प्राण दिले रे ।
त्यागुनी धनदौलत संसारा, तुजला वश केले रे ।
मज कळतचि नाही वेड कसे ।।१।।
परमेश्वरासाठी अनेक भक्तांनी स्वतःचे प्राण अर्पण केले आहे. ही एक सामान्य भावना आहे की, भक्त आपल्या परमेश्वरासाठी काहीही करायला तयार असतात. अगदी स्वतःचा जीव देखील. अनेक भक्तांनी आपल्या श्रद्धा आणि प्रेमाची साक्ष म्हणून बलिदान दिल्याचे उदाहरण आहेत. परमेश्वराकरिता पुराणात अनेक दाखले आहेत. जटायू पक्षी, जांबुवंत वानर, शंकराचा नंदी, गणपतीचा उंदीर, श्री दत्त प्रभूचे श्वान आणि गाय तसेच गजेंद्राने देवाचा धावा केला तेव्हा मगराच्या तावडीतून विष्णूने वाचविले. अनेक धार्मिक युद्धात भक्तांनी आपल्या धर्मासाठी आणि परमेश्वरासाठी लढताना प्राण गमावले आहेत. अनेक साधू, संतानी धनदौलत, संसार त्यागून तपश्चर्या केली. परमेश्वर कृपा प्राप्त करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. धनदौलत, संसार त्याग करणे म्हणजे सांसारिक सुखसुविधा, भौतिक वस्तू आणि कुटूंब यासारख्या गोष्टीपासून दूर राहणे यालाच त्याग किंवा वैराग्य म्हणतात. संत तुकाराम म्हणतात, "वेडा झालो वेडा झालो, वेडीयांच्या गावी गेले । आम्हा नाही कुळ याती, विठ्ठल नाम सांगाती ।।" मला कळत नाही की, परमेश्वर आपलासा करण्याकरिता त्या परमेश्वराच वेड लागत. विठ्ठल नामाच वेड लागल आणि गावोगावी फिरत बसलो. वेड ईश्वर नामाच असाव. देवाच्या भक्तीमध्ये रमून जा आणि इतरांना मदत करा. तुम्हाला परमेश्वराची कृपा प्राप्त होते आणि तुम्ही त्याचेकडे नामाचे आधारे जा. नामाचे वेड लागू द्या.
काय करावे यासाठी बघ, सांग जरा तरी काही?
ज्यांना ज्यांना जाई विचारी, कोणीही सांगत नाही ।
म्हणूनिच रडतो मी साहसे ।।२।।
काय करावे हे कुणीही सांगत नाही. कुणाला विचारले तरी कोणीच सांगत नाही म्हणून परमेश्वराची आठवत येते आणि मला आनंदाने अश्रू अनावर होते. तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, "कधी येशिल मनमोहना, पाहाण्या भारत अपुला पुन्हा । ही मधुर तुझी बासरी, ऐकू दे एकदा तरी ।।" परमेश्वर आपल्याला खरोखरच हवा आहे का? तो कशासाठी? केवळ परमेश्वरासाठी परमेश्वर हवा असे ज्यांना वाटत असेल तो खरोखरच भाग्यवान होय. संतांना खरोखरच तशी नड भासली. परमेश्वराकडे जाण्याची तळमळ आपल्याला का लागत नाही. आपले विकार, अहंपणा, आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचते. या सर्वांचे बंधन तोडून जो परमेश्वराकडे जातो, तो पुन्हा मागे फिरत नाही. संत तुकाराम म्हणतात, "माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे ।" देवाच्या नामासोबतच आत्मचिंतन, प्रार्थना केली पाहिजे.
मज गमते तू सागर जैसा, प्रेमाचा भरलासे ।
म्हणुनिच तुजला ध्यानी, सगळे जीवे शिवे उल्हासे ।
तुकड्या म्हणे, आता वेळ नसे ।।३।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना असे वाटते की, सागर प्रेमाने भरलेला आहे. परमेश्वराचे प्रेम हे कधीही न संपणाऱ्या समुद्रासारखे आहे. आपण कितीही खोलवर गेलो तरी आपण कधीही तळाशी पोहोचू शकत नाही. त्याचे प्रेम आपल्या समजुतीपेक्षा मोठे आहे. समुद्रामध्ये कितीही नदीतील पाणी जमा झाले तरी समुद्र मर्यादा सोडत नाही. परमेश्वर साध्य करायचा असेल तर नाम साधना करावी. जीवे शिवे उल्हासे म्हणजे जीवाला (आत्म्याला) शिव (परमेश्वर) मध्ये उल्हासे म्हणजे आनंद मिळतो. जीवाला परमेश्वरात प्रेम, आनंद मिळतो आणि तेच त्याचे अंतिम ध्येय आहे. जीव ईश्वराचा अंश आहे म्हणून देवाप्रमाणे तो ही सापडत नाही म्हणजे मन, चित्त व बुद्धी यांचे व्दारा जीव कळून येत नाही. श्वसन क्रियेवरुन जीवाचे अस्तित्व कळून येते. परमेश्वराप्रमाणे जीव हा वायुरुप आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, "उद्या करायचे आज करा काही, भरवसाची नाही आयुष्याचा ।" परमेश्वर नाम आताच घ्या. वेळ लावू नका कारण या आयुष्याचा मुळीच भरवसा नाही. देह ही काचेची नळी आहे कधी पडून फुटेल आणि कधी धोका खाईल याचा भरवसा नाही.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....