कारंजा (लाड) : कारंजा विधानसभा मतदार संघाच्या आजवरच्या इतिहासाचे सिहावलोकन केले असता दिसून येते की,मतदार संघ स्थापनेपासून आजवर प्रत्येकवेळी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व हे बहुतांशपणे बाहेरगावच्या रहिवाशी असणाऱ्याच व्यक्तींनी केलेले आहे.मात्र त्यामध्ये कारंजेकर नागरिकांचे जास्तित जास्त प्रेम लाभले ते वाशिम येथील आमदार स्व.राजेंद्र पाटणी यांना.स्व.राजेंद्र पाटणी हे कारंजेकर मतदारांच्या विश्वासाला सार्थ ठरले आणि त्यामुळे पहिल्यांदा विधान परिषद सदस्य व नंतर सलग तिन वेळा कारंजा विधानसभा मतदार संघातून विधानसभेत निवडून येण्याचे राजयोग स्व.राजेंद्र पाटणी यांना लाभले.दोन वेळा शिवसेना पक्षाकडून व मागील दहा वर्षापासून भाजपा पक्षाकडून उमेद्वारी मिळवून कारंजा विधानसभा मतदार संघावर त्यांनी विजयाची भगवी पताका फडकवीली.व यापुढेही त्यांना कुणी त्यांच्या जोडीचा स्पर्धकच निवडणूकीचे रणमैदानात नव्हता.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.एवढा कारंजेकर मतदारांचा त्यांचे वर विश्वास होता.आत्ताच्या कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचा त्यांना गाढा अभ्यास होता व महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाल्यापासून तर त्यांनी मतदार संघाच्या विकासाकरीता विकास कामांचा धडाका लावला होता. आणि त्यामुळेच लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत परत पाचव्यांदा विधानसभेत निवडून येत मंत्रीमंडळात त्यांना स्थान मिळेल आणि ते कारंजा तिर्थक्षेत्र विकासाचा सुद्धा धुमधडाका सुरु करतील.अशी मतदारांची रास्त अपेक्षा सुद्धा होती.मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते.राजकिय शत्रूंशी लढण्यासोबतच त्यांचेवर शारीरिक आजारासोबत सुद्धा लढण्याची वेळ आली होती.मात्र तरीही ते डगमगले नाहीत.आपल्या आजाराविषयी त्यांची ना कोणती तक्रार,ना कोणती चिडचिड.उलट आहे त्या परिस्थितीत आनंदाने जीवन जगत,सदानकदा आनंदात राहून हास्यवदनाने ते जीवन जगत होते.त्यांचेवर भाजपाने काही काळ जिल्हाध्यक्षाची जबाबदारी सुद्धा टाकली होती व त्यांनी देखील जबाबदारीने पूर्णत्वास नेऊन जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात - वार्डा वार्डात भाजपाचे संघटन मजबूत केले होते.त्यामुळे भाजपाचे जिल्हयातील बडे नेते म्हणून त्यांची ओळख होती. प्रदेश नेतृत्वापासून तर केन्द्रिय नेतृत्वही त्यांच्या कार्याबद्दल समाधानी होते.त्यामुळे भाजपा पक्षामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवीले होते.अशा प्रेमळ, मनमिळाऊ,हास्यमुख,अभ्यासू आणि कार्यतत्पर व्यक्तीकडून कारंजेकरांना पुढील काळात भरपूर अपेक्षा होत्या.मात्र आजाराशी झुंज देत असतांना त्या दुर्धर आजारापुढे ते हतबल झाले व अखेर उपचारा दरम्यान शुक्रवार दि 23 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांचे निधन झाले.मुंबईहून त्यांच्या मतदार संघात गावोगावी -खेडोपाडी त्यांच्या निधनाची वार्ता येऊन धडकताच त्यांच्या निधनाने केवळ मतदार संघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक आबालवृद्ध हळहळत होता.त्यांच्या निघनाने "त्यांच्या कर्मभूमी कारंजा विधानसभा मतदार संघाचे व भाजपा पक्षाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असून,कारंजा मतदार संघाला पोरके करून या विकासपुरुषाने निरोप घेतल्याचे" भावपूर्ण उद्गार, त्यांच्या निघनाचे वृत्त कळताच,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी काढले असून त्यांचेप्रती,विदर्भ लोककलावंत संघटना, करंजमहात्म्य परिवार व विविध संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करीत त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याकरीता त्यांचे चिरंजीव आणि कारंजाचे जावाई ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी त्यांचेवर आलेले दुःख विसरून,त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवावा.व हीच श्रद्धांजली त्यांना अर्पण करावी.निश्चितपणे कारंजेकर मतदार त्यांना साद देतील. त्यांच्या सोबत राहतील.अशी भावना व्यक्त केली आहे.