कारंजा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सध्या कारंजा नगर पालिकेकडून दि.11 आक्टोंबर पासून कारंजा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू झालेली आहे.मात्र व्यावसायिक जागा उपलब्ध होत नसल्याने काही लघुव्यवसायिकांनी कारंजा शहरातील रस्त्या रस्त्यांवर आपल्या टपरी,खोके,हातगाडया थाटून अतिक्रमणे केली आहेत तर अनेक मोठ्या दुकानदारांनी आपल्या दुकानाचे समोरील किंवा बाजूच्या जागांवर सुद्धा पक्की बांधकामे करीत अतिक्रमणे केलेली आहेत.त्यामुळे साहजिकच ह्या अतिक्रमणाचा वाहतुकीला प्रचंड त्रास होत होता आणि ही अतिक्रमणे काढण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती असे वृत्त आहे.मात्र ऐन सणासुदीच्या दसरा-दिवाळीच्या मोसमामध्ये अतिक्रमण मोहीम राबविण्यात आल्यामुळे, गोरगरीब लघुव्यावसायिकांच्या पोटापाण्यावरच अतिक्रमण मोहिमेने बुलडोझर चालविल्यामुळे लघुव्यावसायिकांच्या दुकानांचे त्यांनी दसरा दिवाळी करीता आणलेल्या मालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन,त्यांचे दसरा-दिवाळीच्या तोंडावर दिवाळ निघाल्याची भावना या घटनेने संतप्त झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव कपिल महाजन यांनी व्यक्त केली आहे.पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले "वाहतुकीला अतिक्रमणाचा त्रास होतच होता. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला आमचा मुळीच विरोध नाही.परंतु स्थानिक प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याचा जो काळ आणि वेळ निवडली ती मात्र १००% चुकीची आहे. प्रशासनाच्या या मोहिमेने ऐन सणासुदीच्या काळात अक्षरशः शेकडो गोरगरीब लघुव्यावसायिकाच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे व त्यांना कंगाल केले आहे.त्यामुळे प्रशासनाच्या या कारवाईचा आम्ही निषेधच करतो. तसेच शहरात ज्या ज्या वेळी अशा कारवाया होतात त्या त्या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी मुंबईला कींवा बाहेरगावी असतात. कारंजा येथील मतदार अडचणीत असतांना लोकप्रतिनिधीची मदत मिळू नये याचे आश्चर्यच वाटते. असे त्यांनी म्हटले आहे." तसेच "आता प्रशासनाच्या कारवाईमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त लघुव्यावसायिकांना शासन व्यवसायाकरीता जागा उपलब्ध करून देणार काय ?आणि त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून त्यांना आर्थिक मदत करणार काय ?" असा संतप्त सवाल मनसे शहर सचिव कपिल महाजन यांनी केला आहे.