कारंजा : गेल्या सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीनंतर, महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून, जवळ जवळ सर्वच शासकिय - निमशासकिय समित्यांचे गठन लांबणीवर पडलेले होते. त्यामुळे विविध लोकोपयोगी कामे सुद्धा ठप्प झालेली होती . त्या सोबतच, जिल्हा परिषद वाशिमच्या समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या, वृद्ध साहित्यीक कलाकार योजनेच्या, जिल्हास्तरिय कलावंत निवड समितीचे सुद्धा अद्यापपर्यंत गठन झालेले नसल्याने,जिल्ह्यातील कलावंतानी कित्येकदा, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा द्वारे, अध्यक्ष संजय कडोळे यांचे मार्गदर्शनात वेळोवेळी विविध आंदोलने केलीत . शिवाय कारंजा शिवसेना शहरप्रमुख गणेशजी बाबरे यांच्या नेतृत्वात विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे शिष्टमंडळ, अध्यक्ष संजय कडोळे, नंदकिशोर कव्हळकर, उमेश अनासाने, पांडूरंगजी माने, मोहित जोहरापूरकर, हभप अजाब महाराज ढळे, सौ. छायाताई गावंडे, श्रीमती कांताबाई लोखंडे, इंदिराबाई मात्रे इत्यादीनी पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांची समक्ष भेट घेऊन, "कोव्हिड १९ कोरोना महामारीने लोककलावंताचे उदरनिर्वाहाचे साधन असलेले कलेचे सांस्कृतिक कार्यक्रम बंद पडले असल्यामुळे कलाकाराची उपासमार कशी होत आहे . आणि वृद्धापकाळी उदरनिर्वाह आणि औषधोपचारासाठी, दरमहा कलाकार मानधन मिळणे किती अत्यावश्यक आहे . हे पटवून देत, जिल्हास्तरिय कलाकार निवड समिती नव्याने गठीत करून, जवळ जवळ चार पाच वर्षांपासून स्थगीत असलेले कलाकार मानधनाचे प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली." त्यावर लगेच पालकमंत्री ना शंभूराजे देसाई यांनी जून २०२२ पर्यंत इतर सर्व समित्यांचे अगोदर "जिल्हास्तरिय कलावंत निवड समिती" गठन करणार असल्याचे आश्वासन दिले . त्यामुळे कारंजा शहर शिवसेनाप्रमुख गणेश बाबरे यांच्या शिष्टाईला आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या मागणीला निश्चितच यश आले असून येत्या पंधरवाड्यात समितीचे गठन होणार असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.