आजमितीला महाराष्ट्र राज्याच्या,पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री.संत गजानन महाराज संस्थानचा संपूर्ण भारतभर आणि आशिया खंडातच नव्हे तर अख्ख्या जगात नावलौकिक आहे.मात्र संस्थानच्या ह्या जागतिक किर्तीचे आणि नावलौकीकाचे श्रेय जाते ते संस्थानचा निःस्वार्थपणे कारभार पहाणाऱ्या विश्वस्तमंडळी यांना ! ह्या नोंदणीकृत संस्थानचे विश्वस्त आणि पदाधिकारी हे निष्काम कर्मयोगी म्हणून ओळखले जातात.आणि त्याचे कारण म्हणजे संस्थानची स्वच्छता आणि शिस्त.संस्थानच्या शिस्तप्रमाणे येथील पदाधिकार्याचा कारभार चोख असून, दररोजचा संपूर्ण लेखाजोखा दररोजच ठेवला जातो.संस्थानचे पदाधिकारी संपूर्ण दिवसभर संस्थानचे कामकाज सांभाळीत असतांना अगदी इमाने इतबारे करीत असतात.सदर कामकाज देखरेख करीत असतांना ही विश्वस्त मंडळी पिण्याचे पाणी सुद्धा स्वतःचे घरून आणून स्वतः कडीलच पाणी पितात. मंदिरातील प्रसादाचे सुद्धा सेवन करीत नाहीत. भाविकांकडून मिळणाऱ्या दानधर्माच्या धनाचा उपयोग भाविकांच्या आणि समाजाच्या हितासाठी, जास्तित जास्त उपयोगासाठी कसा करता येईल ? ह्याकडे लक्ष्य वेधून तशी कार्य संत गजानन महाराज संस्थान कडून सुरू आहेत. जगाच्या पाठीवर एकमेव असलेले संत गजानन गजानन महाराज संस्थान हे असे संस्थान आहे की,एकदा तुम्ही संस्थानच्या आवारात आलात की,तुम्हाला पार्किंग,महाप्रसाद कशालाही पैसे द्यावे लागत नाहीत.किंवा येथे तुम्हाला कुणीही देणगी, वर्गणी वगैरे मागीत नाहीत.हे एकमेव संस्थान असे आहे की, तुम्हाला येथे देणगी द्यायचीच असेल तर स्वतः होऊन,स्वेच्छेने देणगी द्यावी लागते.आणि होय तुम्ही देणगी दिलीच पाहिजे अशी तुमचेवर कोणतीच सक्ती नाही.आपण आज वर्तमानपत्र,टि व्ही चॅनलला पहातो की,राज्यसरकारला एखाद्या जिल्ह्याचा कारभार निट पहाता येत नाही.साधेच उदाहरण घ्यायचे तर सरपंचाला एका खेडेगावचा-ग्रामपंचायतचा कारभार चालवीता येत नाही. आणि श्री.संत गजानन महाराज संस्थानचा एवढा प्रचंड असा कारभार वर्षानुवर्षे पारदर्शी प्रमाणे चालत आहे.दरवर्षी संस्थानच्या सेवाकार्यामध्ये वाढच होत आहे.आज रोजी भाविकांच्या सेवाकार्या करीता,संस्थानची श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू-आळंदी, त्र्यंबकेश्वर,ओंकारेश्वर इत्यादी अनेक ठिकाणी संत श्री गजानन महाराज शेगावची मंदिरं असून, सदर मंदिराद्वारे भाविक भक्त आणि वारकर्याकरीता विविध सेवाकार्य सुरू आहेत. विशेष म्हणजे सदर संस्थान मध्ये दररोज हजारो नवनविन सेवेकरी महिला व पुरुष स्वयंसेवक निष्काम,अहं सेवाभावाने सेवा देऊन धन्य होत आहेत.अशा संस्थानचे आराध्य दैवत असलेल्या संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मी माझी ही लेखन सेवा आज दि. २० सप्टेंबर २०२३ रोजी,महाराजांच्या चरणाशी अर्पण करीत आहे.उद्देश हाच की श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या कृपाप्रसादाने आपल्या शहरातील,नगरातील किंवा गावखेड्यातील संस्थान-मंदिराचे विश्वस्त-पदाधिकारी आणि पुजार्यांनाही सुबुद्धी येऊन, त्यांनी सुद्धा गावातील मंदिराच्या लोकांकडून मिळणाऱ्या दानधर्मातील देणग्याचा विनिमय लोकोपयोगी समाजकार्या करीता करावा.व निष्काम सेवा कार्य करून स्वतःचा आणि स्वतःच्या घराण्याचा नावलौकिक वाढवून उद्धार करून घ्यावा.आणि दान धर्म करणाऱ्या देणगीदाते दानशूरांनीही केवळ आणि केवळ सत्पात्रीच लोकोपयोगी कार्यासाठी दानधर्म करावा. असो. . . . बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावखेड्यात,शके १८०० माघ वद्य ७ (२३ फेब्रुवारी १८७८) या दिवशी दिगंबरावस्थेत संत गजानन महाराजांचे प्रागट्य झाले.अर्थात ते लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले.त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते.ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||" अशाप्रकारे गजानन महाराज दृष्टिस पडले आणि गजानन नावानेच प्रसिद्ध झाले. भाविक भक्त त्यांना गजानन महाराज म्हणूनच हाका मारू लागले.शेगाव येथील सुसंस्कारी घराण्यातील सावकारीचा व्यवसाय असणाऱ्या बंकटलाल अग्रवाल यांच्या दृष्टिस महाराज सर्वप्रथम पडले.यावेळी महाराज वडाच्या झाडाखाली टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीवरील भाताची शिते वेचून खात होते व जणू बघ्यांना "अन्न हे परब्रम्ह" असल्याची प्रचिती देत होते. त्यावेळी बंकटलाल अग्रवाल यांना महाराजांची तेजस्वी देहकांती आणि वागणूक पाहून देवत्वाची प्रचिती आली.शेगाव येथे महाराजांचा अनेकांनी छळ केला परंतु त्या छळाला महाराज कंटाळले नाहीत.छळ करणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आपल्या वागण्या बोलण्यातून सद् विचाराची प्रचिती आणि अनुभूती आणून दिली.हळूहळू महाराज प्रत्यक्ष श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठलाचे अवतार असल्याचा प्रत्यय भाविकांना येऊ लागला. जानकिराम सोनाराकडे महाराजांनी चिलम पेटविण्यास विस्तव मागीतला.त्याने नकार दिला.महाराजांनी आपल्या अद्भूत योगशक्तीने विस्तवाविना चिलीम पेटवून दाखवीली. महाराजांवरील श्रध्देने आणि विश्वासाने गंगाभारती गोसावी कुष्ठरोगामधून मुक्त झाले. हरी पाटील यांचेसोबत कुस्ती खेळले. जळत्या पलंगावर बसून आपल्या दिव्यत्वाची प्रचिती ब्रम्हगीरी गोसाव्याला करून दिली. बाळापूरच्या बाळकृष्ण बुवाना त्यांनी समर्थ रामदासाच्या रुपात दर्शन दिले.अकोली जहाँगीर येथील दुष्काळग्रस्त गावाला दुष्काळातून सोडविण्यासाठी भास्कर पाटील यांच्या विहीरीला पाण्याचे झरे आणले.भक्तांच्या हाकेला ओ देत पितांबर सैतवाळ महाराजांच्या कोंडोली गावी वाळलेल्या आंब्याला पाने फोडली.बापूना काळे यांना विठ्ठलरूपात पांडूरंगाचे दर्शन दिले.असे महाराजांनी जनकल्याणार्थ अनेक वेळा आपल्या देवत्वाची प्रचिती दिली आहे.याची संपूर्ण माहिती आपल्याला संतकवी श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथामधून मिळते.अशा अद्भूत अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज भक्तप्रतिपालक सच्चितानंद परब्रम्ह शेगावनिवासी संत गजानन महाराजांनी,दि ०८ सप्टेंबर १९१० रोजी देहत्याग करून समाधी घेतली.तो दिवस भाद्रपद पंचमी म्हणजे ऋषीपंचमीचा दिवस होता. दरवर्षी या दिवशी शेगाव नगरीमध्ये श्रींचे समाधी दर्शनाकरिता वारकरी आणि श्रीगजानन भाविकांची मांदियाळी पहायला मिळते.शिवाय गावोगावी या दिवशीची आठवण म्हणून महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरीता महाराजांचे भाविक भक्त महाराजांचा पुण्यतीथी सोहळा भजन,किर्तन,प्रवचन महाप्रसाद करून गावोगावी साजरा करीत असतात. महाराजांच्या गावोगावीच्या प्रत्येक देवालयामध्ये आज मितीला शेगाव संस्थान प्रमाणेच पारदर्शी कारभार सांभाळून भजन,किर्तन,प्रवचन,काकडा, हरिपाठ,महाप्रसाद इ सेवाभावा सोबतच रुग्नसेवा, दुर्धर आजाररस्त व दिव्यांगसेवा, आपात्कालिन सेवेचे कार्यही गावोगावी सुरु असल्याचे दिसून येत आहे.
लेखक : संजय कडोळे
(महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त) गोंधळीनगर,कारंजा(लाड)जि.वाशिम.मो.9075635338