महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेच्या ठिकठिकाणच्या सदस्य आणि आमच्या वार्ताहरांकडून मिळालेल्या वृत्तानुसार कोकण मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ ते पश्चिम विदर्भात,आपल्या वाशिम,अकोला,अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवारी दि.२७ मे २०२५ रोजी वादळी वारे आणि अतिमुसळधार ते मुसळधार पावसाने चोहीकडे सारख्याच प्रमाणात हाहाकार उडवून दिला असल्याचे वृत्त महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी दिले आहे. या संदर्भात जिल्ह्याचे एकमेव आणि अचूक अंदाज सांगणारे हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे पाटील यांनी आधीच पावसाचे भाकीत वर्तवीलेले होते. त्यांच्या भाकितानुसार म्हणजेच हवामान अंदाजानुसार दि २६ मे २०२५ ते ०१ जून २०२५ पर्यंत वादळीवारे,ढगाच्या गडगटासह राज्यात मुसळधार पाऊस होण्याची आणि काही जिल्ह्यात विजा पडण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवीली होती. त्याशिवाय राज्याच्या हवामान विभागाचे अंदाजही काहीसे तसेच होते परंतु तरीदेखील शासन,प्रशासन आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्कतेचा इशारा लक्षातच घेतली नसल्यामुळे ठिकठिकाणी पावसाने कहर केल्याचे दिसून आले. मंगळवारी दुपारनंतर अचानक झालेल्या वादळी वारे आणि ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने अनेक जिल्हयातील नदी नाल्यांची पूरस्थिती बिकट झाली आहे. पूर्व विदर्भात चंद्रपूर,भंडारा,गडचिरोली, गोंदिया आदी ठिकाणी विजा पडल्याने जीवीत हानी झाल्याचे वृत्त असून झाडीपट्टी भागातील धानाचे (भातशेतीचे) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेली उन्हाळी पिके व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातही नदीनाल्यांना आलेल्या पुराने ग्रामिण भागातील अनेक खेडयांचा संपर्क तुटलेला असून जीवीत हानी झाल्याचेही वृत्त मिळत आहे.अकोला जिल्ह्यातही वादळी पावसाने शहरातील अनेक झाडे,विद्युत खांब पडल्याचे,विद्युत तारा तुटल्या असल्याचे,आणि रस्त्या रस्त्यांवर आणि पुलाखालच्या मार्गावर सात ते आठ फूट पाणी साचल्याचे,अकोला येथील खडकी भागात, रतनलाल ते मोठी उमरीचा दोन तिन तास पर्यंत जनसंपर्क तुटल्याचे वृत्त असून वादळी पावसाचा फटका आमदार साजीद खान यांनाही बसल्याचे वृत्त असून त्यामध्ये त्यांच्या चारचाकी वाहनावर झाडे उन्मळून वाहनाचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातही पावसाने शेतकऱ्यांच्या संत्राबागा उध्वस्त झाल्या आहेत.वाशिम जिल्ह्यातही कारंजा तालुक्यात जबरदस्त पाऊस झाला असून शहरातील रस्त्यांना नद्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले. जागोजागी सिमेंटचे रस्ते व मैदाने झाल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने शासनाची 'पाणी वाचवा पाणी जीरवा' मोहिम राज्याच्या प्रत्येक शहरात फसलेली आहे. फळबागा, फुलबागा, उन्हाळी पिके, आंबा, केळी, कांदा,भाजीपाला १००% उध्वस्त झाला आहे. देशाला कांदा पुरविणाऱ्या नाशिक कडील कांदा पिकाचे आणि विक्रीसाठी आलेल्या कांद्याचे नुकसान भरून न निघणारे आहे. आणखी चालू आठवड्यात दि ०१ जूनपर्यंत राज्यात आणि संपूर्ण विदर्भात पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामस्थांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.