नवरात्रीच्या नऊ दिवसांत प्रत्येक दिवशी ठराविक रंगाची साडी नेसावी असा प्रचार सर्वत्र होत असतो. यामागे नक्की असे कारण कुठेही मिळत नाही. काही स्त्रिया म्हणतात की, माझ्याकडे नऊ रंगाच्या साड्या नसल्यामुळे देवी मला प्रसन्न होणार नाही का? माझे नऊ दिवसाचे व्रत मोडले जाईल का? देवीचा कोप होईल का? असे बरेच प्रश्न स्त्रियांचे मनात येतात. देवीची भक्तीपेक्षा भीती अधिक बाळगलेली दिसते. देवीची पूजा करताना धुतलेले वस्त्र परिधान करावे. अमुक एका रंगाचे वस्त्र घालावे असे कोणत्याही धार्मिक ग्रंथात नाही. विविध रंगाच्या साड्या नेसाव्यात पण ज्यांच्याकडे साड्या नाहीत त्यांनी कोणतीही साडी नेसली तरी चालेल. साडी नाही म्हणून देवीचा कोप होत नसतो, कारण आपण सर्व देवीचे मुलं-मुली आहोत. देवीला भक्ताच्या मनातील शुद्ध सात्विक भाव अधिक आवडतो.
देवीच्या नवरात्रीचे नऊ रंग कोण ठरवतं? साडी मार्केटिंग कंपनी हे रंग ठरवित असतात. ४ वेद, ४ उपवेद, ६ शास्त्रे, १८ पुराणे, भगवत्गिता, रामायण, महाभारत, दुर्गा भागवत ई. ग्रंथात सुद्धा नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या परिधान करा म्हणून असे लिहिलेले नाही. पण धुतलेले स्वच्छ वस्त्र परिधान करावे असेच सांगितले जाते. नऊ रंगाची साडी, त्यावर मॕचिंग मार्केटिंग कंपन्यानी ठरविलेले असते. यामुळे साडी विक्रेताचा गल्ला भरण्यासाठी नऊ रंगाचे विज्ञापन दिले जाते.
प्रतिपदेपासून नवरात्रीपर्यंत नऊ दिवस देवीच्या रुपांची पूजा करतात. १. शैलपुत्री, २. ब्रम्हचारिणी, ३. चंद्रघंटा, ४. कूष्मांड, ५. स्कंदमाता, ६. कात्यायनी, ७. कालरात्री, ८. महागौरी, ९. सिद्धीदात्री अशी देवीची नऊ रुपे आहेत. नऊ दिवस अखंड नंदादीप लावून मनोभावे पूजा करावी. नवरात्रीत श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, दास्य, पादसेवन, सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीने देवीला अनन्य भावाने शरण जाऊ या.
नऊ रंगाच्या साड्या नेसणे म्हणजे देवीची भक्ती नव्हे. देवी, देवतेची भक्ती व्यक्तीच्या बाह्य रंगाने होत नसते तर अंतर्मनात शुद्ध सात्विक भक्ती असावी लागते. देव हा भावाचा भुकेला असतो. देवीने अनेक असुरांचा नाश केला. वाईट विचारांचा आणि अपप्रचारांचा निर्भयतेने नाश करून भक्ती वाढण्यासाठी देवीला प्रार्थना करु या.
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वांर्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।।
आपल्या परिस्थितीनुरुप जगदंबेची सेवा करा आणि देवीची कृपा संपादन करा. हिंदू धर्मियांनी आपल्या परंपरा आणि आपल्या देवीची उपासना करणे हे परम् कर्तव्य आहे. आपली संस्कृती जतन करणे आवश्यक आहे. नाहीतर संस्कृतीचा नाश होईल. आपणा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभकामना !
शब्दांकन/लेखक
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोनः 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....