कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : गेल्या अनेक दिवसा पासून पावसाची प्रतिक्षा असतांनाच रविवार रात्री पासून रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याचे दिसून आले. या पावसात जोर नसला तरीही दि. 25 जूनच्या रात्री पासून दि 26 जूनच्या दिवसभर काही तासांच्या अंतरा अंतराने पाऊस येत असल्यामुळे आणि येत्या पाच दिवस विदर्भात रिमझिम ते मुसळधार पाऊस येणार असल्याचा अंदाज, हवामानतज्ञांनी आणि पुणे वेधशाळेनी दिला असल्याने, विदर्भासह कारंजेकर शेतकरी सुखावला असल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करीता कंबर कसली असून, आज बाजारपेठेत कृषी केन्द्रावर बियाणे खरेदी करीता शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली. येत्या आठवड्यात पेरण्या सुरु होणार असल्याचा अंदाज शेतकरी राजाकडून व्यक्त करण्यात येत असून शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त भर सोयबीन व तूर वाण या दोनच पिकांवर दिसून येत आहे. असे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे.