वाशिम ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) : वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्याच्या ग्राम रुईगोस्ता येथील हाडाचे समाजसेवी सेवाव्रती म्हणून ओळखले जाणारे हवामान तज्ञ गोपाल गावंडे हे त्यांच्या हवामानाच्या अचूक अंदाजामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यामुळे शेकडो खेडोपाड्यातील ग्रामस्थ शेतकरी त्यांच्या अंदाजानुसार शेती कामाचे नियोजन आणि संभाव्य धोक्यापासून सतर्क होत असतात हे विशेष. महत्वाचे म्हणजे मागील महिन्यातच त्यांनी "दि 26 व 27 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्वपश्चिम विदर्भ,खान्देशचा काही भाग आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार वादळी पाऊस, गारपिट व विजांच्या कडकडाटाची भविष्यवाणी केली होती." तसेच महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे कारंजा (लाड) येथील अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी भ्रमण ध्वनीवरून बातचित करतांना दि 26 फेब्रुवारी ते 03 मार्च 2024 पर्यंत काही भागात वादळी तर काही भागात गारपिट तसेच जोरदार ते अतिजोरदार आणि काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर उर्वरीत भागात रिमझिम पाऊस पडणार असल्याचे भाकीत करतांना दि 26 फेब्रुवारी 2024 ला मध्यरात्री आँधी तुफान होण्याची शक्यताही वर्तवीली होती. त्यांच्या ह्याच अंदाजाप्रमाणे सोमवार दि 26 रोजी वाशिम जिल्हयाचे आजुबाजूला अकोला जिल्हयात बाळापूर तेल्हारा भागात बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, नांदुरा ,जलंब, मोताळा, सिंदखेड राजा वगैरे सर्वच तालुक्यात तसेच नांदेड जिल्हयातही काही ठिकाणी प्रचंड गारपिटीचा पाऊस कोसळला आहे.त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात शेतमालाचे, भाजीपाला,फळ बागाचे प्रचंड नुकसान झाल्याच्या बातम्या येत असून झाडावरील अनेक पक्षीही मृत्युमुखी पडल्याचे वृत्त मिळाले आहे.तसेच पुढेही 27 ते 28 रोजी व 03 मार्च पर्यंत त्यांचा अंदाज आहे.त्यामुळे निसर्गाच्या प्रकोपामुळे हतबल होत असलेल्या ग्रामस्थ शेतकरी यांनी सर्वप्रथम स्वतःच्या जीवीताची, नंतर आपल्या गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या यांची,शेतातील शेतमालाची शक्य तेवढी जास्तित जास्त काळजी घ्यावी. वातावरणातील बदल,पावसाचे ढग,विजांचा कडकडाट दिसताच शेतातून आपल्या गावी सुरक्षित ठिकाणी यावे. कोणत्याच परिस्थितीत हिरव्या झाडाखाली थांबू नये.असे आवाहन त्यांनी केले आहे.तसेच सोमवारी उशीरा रात्री 01:00 च्या सुमारास कारंजा शहर व तालुक्याला सुद्धा जोरदार पावसाचा तडाखा बसला असून,पावसामुळे काही भागात गहू, हरभरा, भाजीपाला शेतमालाचे नुकसान झाल्याचे वृत्त प्राप्त होत आहे.