आज दिनांक:- ७ ऑगस्ट २०२३ रोज सोमवारी जिल्हा न्यायालयात एक कनिष्ठ वकिलानं आपल्याच वरिष्ठाच्या डोक्यात खुर्ची घातल्याची घटना समोर आलीय. या मारहाणीत वरिष्ठ वकील ॲड. उमरे हे गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी न्यायालयाचं कामकाज सुरू होताच हा प्रकार घडलाय.नेहमीप्रमाणे ॲड. उमरे हे न्यायालयातील आपल्या खुर्चीवर बसून काम करत होते. तेव्हा त्यांचाच ज्युनिअर असलेल्या एका वकीलान खुर्ची उचलून ॲड. उमरे यांच्या थेट डोक्यातच घातली. हा फटका इतका जोराचा होता की, ॲड. उमरे काही क्षणातच रक्तबंबाळ झाले. त्यांच्यावर न्यायालयातील रूग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर त्यांना दुसऱ्या रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आल्याची माहिती आहे.
ॲड. उमरे यांच्या डोक्यात खुर्ची घालणाऱ्या ज्युनिअर वकीलाचं नाव मात्र अजूनही समोर आलेलं नाहीये. ॲड. उमरे यांनी पोलिसांना त्या ज्युनिअर वकीलाचं नाव सांगितलेलं आहे. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्युनिअर वकीलानं वरिष्ठ वकीलांच्या डोक्यात खुर्ची का घातली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, न्यायालयाच्या ज्या जागेत वकील बसतात त्याठिकाणी खुर्ची आणि टेबलासाठी हे भांडण झाल्याची चर्चा आहे.