श्रीकृष्ण जसा भगवत्गिते शिवाय पूर्ण होऊ शकत नाही तसाच राधेच्या भक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. राधा ही कृष्णाची सर्वात प्रिय सखी आणि भक्तीची देवी मानली जाते. श्रीकृष्णाचे राधेवर जेवढे प्रेम होते तेवढेच बासरीवरही होते. श्रीकृष्ण आणि राधा यामध्ये बासरी दुवा होती. राधा कृष्णापेक्षा लहान होती. राधा कृष्णापेक्षा ११ दिवसांनी लहान होती. भगवान श्रीकृष्णाने राधेच्या निधनानंतर बासरी वाजवणे बंद केले. कृष्णाने बासरीचे तुकडे करुन ती झुडपात फेकून दिली आणि त्यानंतर बासरी वाजवली नाही. राधा-कृष्णाचे प्रेम दैवी आणि आध्यात्मिक स्तरावरचे प्रेम मानले जाते.
कधी येशिल मनमोहना ।
पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।धृ।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा प्रसिद्ध अभंग आहे. मनमोहना म्हणजे मोहक सौंदर्याने सर्वांचे मन वेधून घेणारा. महाराज म्हणतात की, हे कृष्णा कधी येशिल तू? माझा भारत पुन्हा पाहण्यासाठी कधी येशिल. भारताची सध्याची परिस्थिती दुःखी आहे आणि तू पुन्हा या भूमीवर यावे आणि या परिस्थितीला सुधारण्याची इच्छा व्यक्त करीत आहे.
ती मधुर तुझी बासरी, ऐकू दे एकदा तरी ।
करी प्रसन्न अमुच्या मना, पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।१।।
हे कृष्णा तुझ्या बासरीची मधुर धून एकदा तरी ऐकू दे. तुझ्या बासरीच्या आवाजाने आमच्या मनाला आनंदीत कर, शांत कर. "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण" या उक्तीप्रमाणे मन प्रसन्न असेल तर सर्व कामे सहजपणे, यशस्वीपणे पूर्ण होतील. भगवान श्रीकृष्णाने आयुष्यभर बासरी वाजवली, मग ते जागृत अवस्थेत असो किंवा झोपेत असो. एक क्षणही त्याने बासरी वादनाची फारकत घेतली नाही. तू बासरी वाजवून आमचे मन प्रसन्न करण्यासाठी भारत पुन्हा पाहण्यासाठी ये.
भारता ग्रहण लागले, अति गुलाम जन जाहले ।
तोडण्या येई बंधना । पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।२।।
मागील काळी भारतावर परकियांनी सत्ता लादली होती. भारत देश स्वतंत्र झाला. जनता गुलामगिरीतून मोकळी झाली. जसे भारताला ग्रहण लागले तसेच आता आयुष्याला ग्रहण लागले आहेत. त्यामुळे जीवन सामान्यपणे जगता येत नाही. या बंधनातून मुक्त होण्याकरिता तुझी गरज भारताला आहे कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख, अडचणी, समस्या आहेत. हे कृष्णा तू पुन्हा आपला भारत पाहाण्याकरिता ये.
ऐश्वर्य तुझ्या वेळीचे, गोपाळ-गोपी मेळीचे ।
नच स्वप्नी दिसे त्या खुणा, पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।३।।
हे कृष्णा तुझ्या गोकुळात गोपी आणि गोपाळांचे आनंददायी मेळावे भरायचे. तुझा सहवास गोप-गोपींना हवाहवासा वाटायचा. त्यावेळीचे ऐश्वर्य म्हणजे वैभव, श्रीमंती, समृद्धी असायची. तू गवळ्यांचा रक्षणकर्ता होतास. आजही मला गोप-गोपींचा मेळा स्वप्नात दिसतात. तू पुन्हा भारत पाहण्यासाठी ये. आमच्या जीवनात सुख, शांती लाभेल.
तुकड्याची आस कर पुरी, तू गरुड सावरी हरी ।
घे धाव नंद-नंदना, पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।४।।
हे देवा तू गरुडावर स्वार होणारा हरी आहेस. माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर. महाराज त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची विनंती कृष्णाला करीत आहे. हे नंदलाला लवकर धावत ये. नंद-नंदना म्हणजे नंदराज्याचा मुलगा कृष्णाला उद्देशून म्हटले आहे. तू एकदा तरी अपुला भारत पाहण्याकरिता जरुर ये.
लेखक:- पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....