वाशिम : महाराष्ट्र राज्य शासनाने इ.सन. १९५४ - ५५ पासून, "पारंपारिक लोककलेच्या व लोककलाकारांच्या सन्मानार्थ" सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत, 'वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजना' अंमलात आणलेली आहे.आज या योजनेचे नामकरण "राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजना" असे झालेले असून या योजनेद्वारे 'कला हेच जीवन' हे ब्रिद ऊराशी बाळगून,आपले संपूर्ण आयुष्य लोककलेकरीता वेचणाऱ्या आणि लोककलेच्या कार्यक्रमाच्या उत्पन्नाद्वारेच आपली गुजराण म्हणजे उदरनिर्वाह करणाऱ्या,अशा पारंपारिक लोककलाकारांचा वृद्धापकाळ सुखकर व्हावा. म्हातारपणी त्यांना जेवणाची व औषधोपचाराची सोय व्हावी. यासाठी शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची ही योजना अंमलात आणण्यात आलेली आहे.परंतु खरेखुरे कलावंत पारंपारिक लोककलाकार सोडून, अन्य 'कलाकारच' ह्या योजनेचा लाभ घेतांना आढळले आहेत. शिवाय योजनेच्या लाभासाठी काही ठिकाणी आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचीही प्रकरणे ऐकीवात आहेत.त्यामुळे सदर योजनेची अंमलबजावणी पारदर्शी पद्धतीने होणे जरूरी आहे. ह्या योजनेच्या लाभासाठी कलाकाराने आपल्या अर्जासोबत,मागील पंधरा वर्षातील लोककलेचे,राष्ट्रिय कार्यक्रम,समाजप्रबोधन, व्यसनमुक्तीचे कार्यक्रमातून जनजागृती केल्याचे,सबळ साक्षी पुरावे म्हणजेच १) मिळालेले राज्य शासनाचे वा शासनमान्य संस्थाचे पुरस्काराचे सन्मानपत्र किंवा कलेच्या गौरवाबद्दलची प्रमाणपत्र.२) कला सादरीकरण केल्याची छायाचित्रे.३) वृत्तपत्रीय बातम्यांची कात्रण.४) वयाचा दाखला म्हणून जन्म प्रमाणपत्र+ शाळा सोडण्याचा दाखला वगैरे ५) रहिवाशी दाखला म्हणून रेशन कार्ड,६) महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे अधिवास किंवा राष्ट्रियता प्रमाणपत्र.७) आधारकार्ड,८) तहसिलदार यांचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.९) कलाकार दिव्यांग असल्यास यु.डी.आय.डी. कार्ड व दिव्यांगाचे प्रमाणपत्र.१०) स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार किंवा खासदाराचे शिफारसपत्र ११) उदरनिर्वाहासाठी लोककले शिवाय उत्पन्नाचा दूसरा कोणताही स्त्रोत नसल्याचे किवां आर्थिक उत्पन्नाचे अन्य साधनच नसल्याचे स्टॅम्पपेपरवर नोटरी कडून प्रमाणित केलेले प्रतिज्ञापत्र जोडणे अत्यावश्यक आहे.सन २०२५-२६ ह्या चालू वर्षापासून ऑनलाईन अर्ज पद्धतीमुळे संबंधीत विभागाकडून नियमावलीची काटेकोर पडताळणी,कलेचे सादरीकरण घेऊन प्रत्यक्ष मुलाखती व कलाकारकडे उत्पन्नाचे दूसरे अन्य साधन आहे का ? याची काटेकोरपणे तपासणी होऊनच मानधन लाभार्थ्यांची निवड होणार आहे.त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव तयार करतांना जास्तित जास्त काळजीपूर्वक आपल्या कलेचे सर्व साक्षी पुरावे व कलेच्या सादरीकरणाचे छायाचित्र व कागदपत्रासह जोडूनच, जवळच्या सेतू केन्द्रामधून ऑनलाईन करून,लेखी पावती घ्यावी.पावती निट सांभाळावी. व त्यानंतर आपल्या प्रस्तावाच्या दोन प्रतिमध्ये फाईल तयार करून,मा.गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात सादर कराव्यात.असे आवाहन विदर्भ लोककलावंत संघटना यांचे कडून करण्यात आले आहे. शासनाने अंमलात आणलेली वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजनेची ऑनलाईन पद्धती ही पारदर्शी असून ह्या पद्धतीने निश्चितच भ्रष्टाचार व बोगस कलाकारांना आळा बसणार असल्याचे मत विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.