वाशिम : एकेकाळी कारंजा (लाड) येथे पंचरंगी कलापथक मंडळाद्वारे,रंगभूमी गाजविणारे नटसम्राट कलावंत प्रकाश व्यंकटराव वानखडे यांचे नाव आजही जुन्या पिढीतील कला रसिकांच्या ओठावर निश्चितच असते. बालपणा पासून आपल्या विनोदी नकलाने कारंजा शहरातील श्री महाराणा प्रताप व्यायाम शाळेचा गणेशोत्सव, दुर्गोत्सव,पोळा,होलिकोत्सव गाजविणाऱ्या ,इसन 1980-1990 च्या दशकातील नटसम्राट प्रकाश व्यंकटराव वानखडे यांनी कारंजा येथे लोककलावंत ज्ञानेश्वर विठ्ठलराव कडोळे, शाहीर देवमन मोरे, महाराणा प्रताप यांची भूमिका वठविणारे स्व.विजय गुल्हाने प्रकाश गवळीकर आदी मित्राच्या संगतीने पंचरंगी कलापथक मंडळाची स्थापना केलेली होती. कारंजा जेसिज क्लबच्या सांस्कृतिक कला महोत्सवात दरवर्षी हिरीरीने भाग घ्यायचे. व पारितोषिकही पटकवायचे. "सत्वर पावजो मला रे ss घोंगड्या रोटगा वाहीन तुला sss" या लघुनाट्यात देव अंगात आणून ते अंधश्रद्धेवर प्रहारही करायचे. असा हरहुन्नरी कलाकार आज वयाची सत्तरी पूर्ण झालेला. घरात अठरा विश्वे दारिद्रय. स्वतः आणि पत्नी दोघेही आजारी. त्यांच्या एका मोठ्या मुलाचा अकाली मृत्यु झालेला.तर दुसरा मुलगाही रक्तदाबाने ग्रस्त. वृद्धापकाळी जर्जर आजाराने रोजमजूरी करता येत नाही. त्यामुळे शासनाच्या राजर्षी शाहू महाराज वृद्धापकाळ साहित्यीक कलाकार मानधन योजनेकरीता गेल्या पाच सहा वर्षापासून प्रस्ताव टाकलेला आहे.तरी मायबाप शासनाचे मानधन मंजूर व्हावे ह्या अपेक्षेत असलेल्या अशा गरजू कलाकाराला शासनाने विनाअट मानधन मंजूर करावे.अशी मागणी विदर्भ लोक कलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केली आहे.