वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : ऊसतोड कामगारांचे व त्यांच्या कुटूंबियांचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी ऊसतोडणी व्यवसायातील ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केले आहे.
ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा, याकरीता राज्यातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे सतत मागील तीन वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील त्यांची ग्रामसेवकामार्फत संबंधित गावातील, वस्त्यांमधील,तांड्यामधील व पाड्यांमधील व इतर नोंदणी करण्यात येणार असून ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यासाठीचा सर्व्हेक्षण/आवेदन पत्राचा, स्वयंघोषणापत्राचा व ओळखपत्राचा विहीत नमुना जीमेलद्वारे तसेच ऊसतोड कामगारांची नोंदणी जलद व सुलभ होण्याच्या हेतूने गुगल फॉर्म लिंकसुद्धा जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी ऊसतोड कामगारांनी नोंदणी करुन ऊसतोड कामगार असल्याबाबतचे ओळखपत्र संबंधित ग्रामसेवकाकडून प्राप्त करुन घ्यावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.