कारंजा - विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ,इस्त्रो, स्वा.से.क.रा.इन्नाणी महाविद्यालय, विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय, व्होकेशनल महाविद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलच्या संयुक्त विद्यामाने शनिवार, २ डिसेंबर रोजी स्थानिक विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयात अंतरिक्ष महायात्रा अवतरली होती. त्यानिमित संस्थेत उद्घाटनीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार राजेंद्र पाटणी, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर,ए.पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान भारती मंडळाचे समन्वयक नरेंद्र सातफळे (नागपूर), सदस्या मनिषा घारे (नागपूर), कारंजा पंचायत समितीचे सभापती प्रदीप देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजीव काळे, तहसीलदार कुणाल झाल्टे, डॉ.अजय कांत, स्थानिय व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर बंग, माजी नगराध्यक्ष विजय बगडे, सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ अजय कांत,गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, विज्ञान भारतीचे निलेश नारखेडे,धनंजय जोशी आदीची उपस्थित होते. याप्रसंगी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आटोपला. याप्रसंगी विज्ञान भारतीचे सातफळे यांनी विज्ञानाची माहिती शाळकरी मुलांपर्यंत पोहोचण्या साठी आमचे मंडळ प्रयत्नशील असून, कारंजा शहरात हे मंडळ स्थापन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. उद्घाटनीय भाषणात आ.पाटणी यांनी इस्त्रो ही जगातील उत्कृष्ट संशोधन संस्थेपैकी एक आहे. सामान्यातील सामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचण्यासाठी भारत सरकार कसोसीने प्रयत्न करत असून, आपल्या सर्वांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर लवकरच आपला देश महासत्ता म्हणून जगासमोर येईल असा आशावाद व्यक्त केला. प्रास्ताविक विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष विजय भड यांनी इसरो चा आर्यभट्ट ते चंद्रयान-3 पर्यंत च्या प्रवासाचे वर्णन केले. सूत्रसंचालन विभा लाहोटी, तर आभारप्रदर्शन प्रा.एल.डी.खरड यांनी केले. कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक, प्राध्यापक वर्ग, महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, अंतरिक्ष महायात्रेतंर्गत महाविद्यालयाच्या प्रांगणात इस्रोची एक बस पोहोचली होती. या बसमध्ये इस्त्रोने राबविलेल्या विज्ञान मोहिमेच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. ते पाहण्यासाठी तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतीळ सुमारे ७ हजार २३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रतिकृती पाहण्यासाठी विद्यार्थांनी एकच झुंबड केली होती.