अकोला - लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने मासिक विचारमंथन कार्यक्रमात पत्रकारांची रेल्वे प्रवास सवलत आणि ईतर प्रश्नांसोबतच अकोला विमानतळावरून हवाई उड्डाण सुरू करण्याचा प्रस्ताव युवा खासदार अनुप धोत्रे यांचेकडे मांडला होता.त्या प्रस्तावांपैकी हवाई उड्डाण सुरू करण्याच्या आश्वासनाला त्यांनी निर्णयाची जोड दिली असून त्यानुसार अकोला विमानतळावरून १९ आसनी विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. केन्द्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत अकोला शहरातील शिवनी विमानतळावरून ही हवाईसेवा सुरू करण्याच्या पूर्वतयारीला सुरूवात झालेली आहे. त्यानुसार हवाई सेवा देणाऱ्या कंपन्यांनी प्रवास मार्गांचे सर्वेक्षण सुरू केलेले आहे.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या दि.३० जून रोजी झालेल्या नियमित मासिक विचारमंथन मेळाव्यात युवा खासदार अनुप भाऊ धोत्रे यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय संघटन प्रमुख व मार्गदर्शक प्रकाश भाऊ पोहरे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी पत्रकारांच्या कोरोना काळापासून बंद करण्यात आलेल्या रेल्वे प्रवास सवलतीबाबत व केन्द्र सरकार कडील ईतर मागण्यांवर चर्चा घडविण्याची,तर मार्गदर्शक पदाधिकारी विजयराव बाहकर यांनी अकोला विमानतळावरून हवाई प्रवासाचा मार्गी लावण्याची विनंती खासदार धोत्रे यांचेकडे केली होती.या सर्व प्रस्तावावर त्यांनी परत माईकसमोर येऊन स्पष्टीकरण देत सर्व मागण्यांचा विचार करून हवाई प्रवासाच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले होते. तसा प्रस्ताव त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला होता.
महत्वाकांक्षी "उडान"योजनेअंतर्गत विमानसेवेचा विस्तार व प्रादेशिक मार्गांवर परवडणारा हवाई प्रवास सुरू करण्याचे केन्द्र सरकारचे उद्दिष्ट आहे.त्यानुसार १९ आसनी विमानांव्दारे हवाई सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांकडून चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे. शिवणी विमानतळाचा विस्तारीकरण प्रश्न भूसंपादनाची अडचणींमुळे प्रलंबित आहे. त्यामुळे हवाई प्रवास सुरू करण्यासाठी आहे त्याच १४०० मिटर धावपट्टीवरून १९ आसनी विमानसेवा सुरू करण्यासंबंधी खासदार धोत्रे यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री ना.मुरलीधर मोहोळ यांचेशी विस्तृत चर्चा केली.त्यानुसार हवाई कंपन्यांशी सुध्दा बोलणी सुरू आहे.त्यांनी सुध्दा या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली आहे.
त्यानुसार मार्गांच्या सर्वेक्षणातील प्रथम टप्प्यात अकोला येथून मुंबई, पूणे, हैद्राबाद, इंदोर, अहमदाबाद, सुरत,तिरूपती ह्या मार्गावरील विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या शुभारंभामुळे अकोला जिल्ह्यातील पर्यटनस्थळांसाठी पर्यटकांची व शेगाव येथे येणाऱ्या भक्तांची विशेष सोय होणार असून अकोला जिल्ह्याच्या सामाजिक,औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
लोकसस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने मांडलेल्या प्रश्नावर खासदार अनुप पात्रे दिलेल्या अभिवचनानुसार तातडीने निर्णय घेऊन हवाई सेवेचा मार्ग मोकळा करण्याची कार्यवाही केल्याबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक - राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व सर्व केंद्रीय राज्य,विभागीय आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.