अकोला :-
क्षयरोगाच्या नवीन केसेस कमी करणे हा उद्देश समोर ठेऊन भारत सरकारने राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत 2025 पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे महत्त्वाकांक्षी धोरण निश्चित केलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर क्षयरोगमुक्तीसाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे सरसावले आहेत. दरम्यान, या जिल्ह्यांनी केलेल्या कार्याचे केंद्रीय पथकाकडून मूल्यमापन करण्यात आले असून, क्षयरोगमुक्तीमध्ये उत्कृष्ट काम करणारे जिल्हे पुरस्कारासाठी पाञ ठरले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातून अहमदनगर जिल्ह्याने 5 लाखांचा गोल्ड पुरस्कार पटकाविला असून, अकोला आणि बीड जिल्ह्याला प्रत्येकी 2 लाख रूपयांचा ब्रॉन्झ पुरस्कार घोषित झाला असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हरी पवार यांनी दिली. क्षयरोग दूरीकरणासाठीच्या उपाययोजना करण्यामध्ये अकोला जिल्हा महाराष्ट्रात सध्या पाचव्या स्थानावर आहे, हे येथे उल्लेखनीय! या पुरस्काराने जिल्ह्याच्या आरोग्य विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा पातळीवरून क्षयरोग दूरीकरणासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात येतात. त्याचे फलित म्हणून राज्यात क्षयरूग्णांचे प्रमाण घटत चालल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारे देशातील राज्ये आणि राज्यातील जिल्हे क्षयरोगमुक्तीचा दर्जा मिळविण्यासाठी झटत आहेत. अशा उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या राज्य आणि जिल्ह्यांना केंद्र शासनाच्यावतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी सन 2015 मध्ये असलेल्या क्षयरोगाच्या परिस्थितीच्या तुलनेत सध्या असलेली परिस्थिती विचारात घेतली जाणार आहे. पुरस्कारासाठी केंद्र शासनाने राज्य आणि जिल्हे यांच्यासाठी ब्रॉन्झ (20 टक्के प्रगती) , सिल्व्हर (40 टक्के प्रगती) आणि गोल्ड (60 टक्के प्रगती) अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी केली असून, त्यासाठी ब्रॉन्झमध्ये अनुक्रमे राज्याला 25 लाख आणि जिल्ह्याला 2 लाख, सिल्व्हरमध्ये अनुक्रमे राज्याला 50 लाख आणि जिल्ह्याला 3 लाख, गोल्डमध्ये अनुक्रमे राज्याला 75 लाख आणि जिल्ह्याला 5 लाख रूपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा गेल्याच महिन्यात करण्यात आली होती.
सन 2015 च्या तुलनेत आणि केंद्रीय क्षयरोग विभागाच्या नियमांनुसार क्षयरोग प्रसारणाचा दर 85 टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने या उपक्रमांतर्गत राज्य व जिल्हे यांच्याकडून या पुरस्कारांसाठी दावे किंवा अर्ज मागविले होते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी यांना जिल्हा व राज्यांनी केलेल्या दाव्याची / अर्जांची पडताळणी करण्याची जबाबदारी सोपविली होती. केंद्रीय पथकाने पाहणी करून शासनाला सादर केलेल्या मुल्यांकनाच्या आधारावर महाराष्ट्रातून बीड आणि अकोला जिल्ह्याला प्रत्येकी 2 लाख रूपयांचा ब्रॉन्झ पुरस्कार घोषित झाला असून, येत्या 24 मार्च रोजी दिल्ली येथे आयोजित समारंभात पुरस्कारप्राप्त राज्ये आणि जिल्ह्याच्या संबंधित अधिकारी व प्रतिनिधींना हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे डॉ. हरी पवार यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यात दहा पथकांकडून सर्व्हेक्षण करण्यात आले. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नीमा अरोरा, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चौहान, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हरी पवार यांनी केले होते, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी सर्व्हेक्षणादरम्यान पथकांना सहकार्य केले.
-------------------------
:: BOX::
60 हजार लोकसंख्येचे केले सर्व्हेक्षण
ज्या जिल्ह्यांनी क्षयरोगमुक्त दर्जा मिळविण्यासाठी दावे किंवा अर्ज सादर केले अशा जिल्ह्यांमध्ये संमिश्र पध्दतीने अभ्यास करण्यात आला. त्यासाठी अकोला जिल्ह्यात प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश असलेली एकूण दहा पथके नेमण्यात आली होती. तालुकास्तरावर दोन आणि जिल्हास्तरावर पाच जण सुपरव्हिजनसाठी नेमण्यात आले होते. एका पथकाने दररोज दहा घरे अशाप्रकारे 20 दिवसांमध्ये एकूण 1 हजार घरांचे सर्व्हेक्षण केले. ग्रामीण भागातील दहा हजार आणि शहरी भागातील दोन हजार अशी एकूण 12 हजार घरे या सर्व्हेक्षणात विचारात घेण्यात आली असून, त्या अंतर्गत 60 हजार लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्याद्वारे जिल्हा क्षयरोग विभागाने केलेल्या कामाचे सर्व्हेक्षण करण्यात येऊन त्याची सविस्तर माहिती केंद्रीय पथकाला देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे केंद्रीय पथकाने अकोला जिल्ह्यात भेट देऊन जिल्ह्याच्या कामाचे मूल्यमापन केले, यामध्ये अकोला जिल्ह्याला 2 लाख रूपयांचा ब्रॉन्झ पुरस्कार घोषित झाला असल्याचे डॉ. हरी पवार यांनी सांगितले.
-----------------------------------
:: चौकट ::
महाराष्ट्रातून अहमदनगर, अकोला आणि बीड जिल्ह्याची बाजी
महाराष्ट्र राज्यातून या स्पर्धेत अकोला आणि बीड या दोन जिल्ह्यांनी बाजी मारीत 2 लाखांचा ब्रॉन्झ पुरस्कार मिळविला असून, अहमदनगर जिल्ह्याने 5 लाखांचा गोल्ड पुरस्कार पटकाविला आहे. स्पर्धेत भाग घेणारे औरंगाबाद, भंडारा, गडचिरोली आणि हिंगोली हे जिल्हे पुरस्कार मिळविण्यात अपयशी ठरले.
-----------------------------------
आपल्या प्रतिक्रिया द्या....