वढवी:-कारंजा येथून जवळच असलेल्या महाराष्ट्रातील प्रति देहू म्हणून पावन झालेल्या ग्राम वढवी इथे संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण झाले असून दिनांक 7/04/2024 ते 09/04/2024 पर्यंत विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे वढवी या गाव खेड्यास पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सदर कार्यक्रमांस तीन दिवस होशंगाबाद येथील विद्वान असलेल्या अनेक संत महंत विद्वानाचे आगमन झाले असून सर्व कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनात पार पडणार आहेत.
त्यानिमित्ताने रविवारी प्रथम दिवशी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची गावात भव्य मिरवणूक सकाळी 9 ते दुपारी 3 दरम्यान काढण्यात आली असून मिरवणूकीस गावातील जय बजरंग हरिपाठ मंडळ, मसनी येथील भजनी मंडळ, मौजे चिंचखेड येथील संत एकनाथ हरिपाठ मंडळ, ग्राम वढवी येथील महिला भजनी मंडळ इ .सह परिसरातील अनेक सांप्रदाईक भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ यांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवीला.
मिरवणुकीपूर्वी विक्रमी 60-70 जोडप्यांनी पूजाविधित सहभाग नोंदवला तेव्हा या सर्व जोडप्यांना होशंगाबाद येथील पंडित मंडळींनी विधिवत स्नान घालून पूजेचा रीतसर विधी पार पाडला. मिरवणुकीनंतर दहीहंडीचा कार्यक्रम झाला व नंतर प्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमांस प्रहार जनशक्ती पक्षाचे कारंजा/मानोरा मतदार संघाचे विधानसभा अध्यक्ष अनुपभाऊ ठाकरे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून पूजेत सपत्नीक सहभाग घेतला व या अनोख्या सोहळ्याचे पुण्य पदरात पाडून घेतले.
समस्त गावकरी मंडळी वढवी यांचेकडून परिसरातील भाविकांना या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण असून मूर्तीची स्थापना व महाप्रसाद दिनांक 09/04/2024 रोजी आयोजीत करण्यात आलेला असून परिसरातील भाविकांनी या सोहळ्याचा व भव्य महाप्रसादाचा लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.