कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूर द्वारा नागपूर येथील अंजुमन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या कॉम्पिटिशन साठी श्री बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील वर्ग नववीचा अभिषेक कैलास कापसे व वर्ग दहावीच्या विश्वास सिद्धार्थ इंगोले यांनी तयार केलेल्या "स्टेअर लिफ्ट चेअर" या विज्ञान प्रोजेक्ट निवड करण्यात आली आहे.
विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ द्वारा मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन 2024 च्या आयोजन दिनांक 17 ते 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत नागपूर येथे करण्यात आले आहे. सदर कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होण्यासाठी बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी येथील मुख्याध्यापक तथा विज्ञान शिक्षक विजय देविदास भड यांच्या मार्गदर्शनात अभिषेक व विश्वास इंगोले तयार केलेल्या स्टेअर लिफ्ट चेअर या वैज्ञानिक प्रोजेक्टची ऑनलाईन नोंदणी केली होती. विज्ञान भारती विदर्भ प्रदेश नागपूर तर्फे यावर्डीच्या विज्ञान प्रोजेक्टची निवड करण्यात आली, असा मेल प्राप्त झाला.
त्यामुळे मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होण्यासाठी बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी विज्ञान शिक्षक तथा मुख्याध्यापक विजय भड व दोन विद्यार्थी अभिषेक कापसे आणि विश्वास इंगोले आपल्या प्रोजेक्टसह उपस्थित राहणार आहेत.
स्टेअर लिफ्ट चेअर हा प्रोजेक्ट लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत तसेच दिव्यांगासाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्यांना घरातील पायऱ्या चढणे कठीण आहे अशा व्यक्तीसाठी हा प्रोजेक्ट वरदान ठरणार आहे. या प्रोजेक्ट मुळे घरातील गृहिणींना पण फायदा होणार आहे, सिलेंडर सारख्या जड वस्तू स्टेअर लिफ्ट चेअरच्या सहाय्याने सहज दुसऱ्या मजल्यावर नेता येतील.
बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीच्या विज्ञान प्रोजेक्टची निवड मॉडल मेकिंग कॉम्पिटिशन साठी झाल्याबद्दल विजय भड, अभिषेक कापसे व विश्वास इंगोले यांचे संस्थेचे अध्यक्ष योगेश खोपे व संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे शिक्षक राजेश शेंडेकर, गोपाल काकड, अनिल हजारे व शिक्षकेतर कर्मचारी देविदास काळबांडे, भालचंद्र कवाने, राजू लबडे, राजेश लिंगाटे, राजेंद्र उमाळे आदिनी अभिनंदन केले आहे. यावर्डीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.