राजस्थान येथुन पुण्यातील विमानतळ भागात अफिम या अंमली पदार्थाची विक्री करणा-यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. आरोपीकडून तब्बल 5 किलो 519 ग्रॅम अफिम जप्त करण्यात आले आहे.बाजारात याची किंमत तब्बल 1 कोटी 10 लाख 38 हजार रुपये एवढी आहे.
राहुलकुमार भुरालालजी साहु (वय 32, रा. मंगलवाडा, जि. चितोडगड, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून शहरात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पथकाकडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांचे पथक विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान लोहगाव भागातील पोरवाल रोड येथील एस.बी.आय बँक जवळील आयजीधान कोऑपरेटीव्ह सोसायटीच्या गेट समोर एकजण संशयितरित्या थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून राहुलकुमार साहु याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे आफिम हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याच्याकडून तब्बल 5 किलो 519 ग्रॅम अफिम जप्त करण्यात आले.
गुन्हे शाखेने मागील काही दिवसात अंमली पदार्थ तस्कराकडून मोठ्या प्रमाणांत साठा जप्त केला आहे. नुकतेच फुरसुंगी येथून मोहनलाल मेगाराम बिश्नोई (वय 24) याला अटक करून 3 किलो अफिम जप्त करण्यात आले होते. यानंतर आता तब्बल एक कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीष गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, दिगंबर चव्हाण, अंमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, संदिप शेळके, महेश साळुंखे, आझीम शेख, युवराज कांबळे, दिशा खेवलकर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
विमानतळ भागातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 5 किलो अफिम जप्त करण्यात आले असून तो राजस्थानातील रहिवासी आहे. त्यादृष्टीने पुढील तपास करण्यात येत आहे.
- सुनील थोपटे, पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक.
आपल्या प्रतिक्रिया द्या....