“एक जीव वाचला... कारण माणुसकी जीवंत होती”
कारंजा : रविवार दिनांक ६ जुलै २०२५ ची संध्याकाळ.सिंधी कॅम्प परिसरात मोठ्या नाल्यात एक म्हैस जखमी अवस्थेत जीव मुठीत धरून पडलेली होती. आजूबाजूला गर्दी,घबराट, चिंता... पण एक गोष्ट ठाम होती — माणुसकी अजून जिवंत होती. या संदर्भात शुभम झोपाटे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांना दिलेल्या माहिती नुसार
नाल्यात पडलेली म्हैस मृत्युच्या सापडयात अडकल्याची माहिती मिळताच ‘सास कर्तव्य सेवक’ अमोल कडू यांना तातडीने सर्वधर्म मित्र मंडळाचे अध्यक्ष श्याम सवाई यांच्याशी संपर्क साधला. श्याम सवाईनी वेळ न दवडता फायरमन शुभम झोपाटे यांना घटनेची कल्पना दिली. त्यांनी तातडीने कारंजा नगरपरिषद अग्निशमन विभागाचे अधिकारी विवेक वळसे यांना माहिती कळवून, कर्तव्यावर असलेले अधिकारी विवेक वळसे,चालक संजय रेवाळे,फायरमन सचिन बैस, शुभम झोपाटे,मुजम्मिल खान, इमरान खान, विक्की बारबोले घटनास्थळी पोहोचले.अंधार, गंध,पाण्याचा प्रवाह आणि अपघाताचा धोका असतानाही त्या सर्वांनी धोका पत्करून अथक प्रयत्नाने म्हशीला बाहेर काढलं.
‘वन सेकंड–वन कॉल’ या तत्त्वावर काम करणाऱ्या सास सेवक अमोल कडू यांनी वेळेवर दिलेली माहिती आणि शुभम झोपाटे यांची तत्परता यामुळे एका मुक्या प्राण्याचा जीव वाचला.हे फक्त एका प्राण्याचं रक्षण नव्हतं — ही माणुसकीची जिवंत ओळख होती.
घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनीही जबाबदारीने व संवेदनशीलतेने भूमिका बजावली.सर्वधर्म मित्र मंडळाचे समन्वय, ‘सास कंट्रोल रूम’चे कार्य आणि अग्निशमन विभागाची तत्परता यामुळे मोठा अनर्थ टळला.
“आपत्ती कोणतीही असो, जीव वाचविणं हाच सर्वोच्च धर्म”
या घटनेतून हेच पुन्हा अधोरेखित होतं की,कारंजा लाड शहरात आपत्ती व्यवस्थापनाचं बळ हे केवळ यंत्रणेपुरतं न राहता, लोकसहभागाने जिवंत आहे.
आज एक म्हैस वाचली,पण त्याबरोबर माणुसकीही वाचली.
---
आपल्या प्रतिक्रिया द्या....