वाशिम - शासनाच्या लेखी बंद झालेल्या परंतु अनाधिकृतपणे प्रकाशित होत असलेल्या वृत्तपत्रांमुळे इतर कायदेशीर वृत्तपत्रांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून बातमीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकाशित होत असलेल्या वृत्तपत्रांवर व त्यांच्या मालक, संपादक, प्रकाशक आणि मुद्रकांवर कारवाई करावी अशी मागणी आर्यव्रत प्रेस कौन्सिलच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत कौन्सिलचे संचालक डॉ. माधव हिवाळे यांनी मंगळवार, १३ फेब्रुवारीला उपविभागीय अधिकार्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद आहे की, ऑफीस ऑफ रजिस्ट्रर ऑफ न्युजपेपर फॉर इंडिया नवी दिल्ली (आर.एन.आय.) ही संस्था भारतभरातील वृत्तपत्राचे व्हेरीफिकेशन,पंजीयन आणि परिचालनाचे कार्य करते.तसेच आर.एन.आय. चे जिल्हयातील सक्षम अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे नविन वृत्तपत्राचे घोषणापत्र मंजूर करुन वृत्तपत्र सुरु केले जाते.ज्या वृत्तपत्राला रजिस्ट्रेशन क्रमांक आहे तेच वृत्तपत्र अधिकृत समजल्या जाते. ( फक्त टायटल कोड क्रमांकावर वृत्तपत्र प्रकाशित करता येत नाही. जाहिरनामा देऊन टायटलला रजिस्ट्रेशन क्रमांक मिळणे अत्यावश्यक असते.) मात्र वाशिम जिल्हयात अनेक साप्ताहिक, दैनिक व इतर नियतकालीक वृत्तपत्रांचे व्हेरीफिकेशन व रजिस्ट्रेशन क्रमांक डीब्लॉक,रद्द वा डिफॉल्ट झालेले आहेत.वृत्तपत्रे नियमित प्रकाशित न करणे,वृत्तपत्रे संबंधीत कार्यालयात न पाठविणे, दरवर्षी आर्थिक वर्षात ई फायलींग न करणे आदी अनेक कारणे यामागे आहेत.अशी बंद पडलेली,डीब्लॉक, रद्द व डिफॉल्ट झालेच्या वृत्तपत्रांचे घोषणापत्र रद्द करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुरक्षित आहेत.मात्र वाशिम जिल्हयात बंद पडलेली, डीब्लॉक,रद्द व डिफॉल्ट असलेली अनेक वृत्तपत्र बिनबोभाटपणे सुरु आहेत.
तसेच ही वृत्तपत्रे प्रकाशित करुन त्याव्दारे संबंधीत प्रकाशक आपला आर्थिक लाभ करुन जनतेची आणि शासनाची दिशाभूल करीत आहेत.अशा वृत्तपत्रांची जिल्हा वर्गवारी यादी आर.एन.आय. च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपणाकडे घोषणापत्र सादर करुन प्रकाशित झालेले प्रत्येक वृत्तपत्र आपल्या कार्यालयात तसेच संबंधीत कार्यालयात नियमितपणे देणे आवश्यक आहे. मात्र वाशिम जिल्हयात बंद पडलेली, डीब्लॉक, रद्द व डिफॉल्ट झालेली अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होत असून त्यामुळे इतर अधिकृतपणे प्रकाशित होत असलेल्या वृत्तपत्रांच्या हित व अधिकाराला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे अशा वृत्तपत्राचे संपादक, प्रकाशक, मालक व मुद्रकावर कायदेशीर कारवाई करुन त्यांचे घोषणापत्र रद्द करावे.जेणेकरुन इतर अधिकृत असलेल्या वृत्तपत्रांची विश्वासार्हता जनतेमध्ये कायम राहील. निवेदनावर ठोस कार्यवाही न झाल्यास काऊंन्सिलच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती आर.एन.आय. नवी दिल्ली व जिल्हा माहिती अधिकारी यांना दिल्या आहेत.