कलकत्ता येथील मेडिकल कॉलेज मधे सलग ३६ तासांची रूग्णसेवा दिल्यानंतर सेमिनार रुममध्ये आरामासाठी गेलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या डॉक्टर विद्यार्थीनीवर अतिशय अमानुषपणे गॅंग रेप करून तिची निर्घृण हत्या केली गेली. जवळ जवळ सर्वच मेडीकल कॉलेज मधे विद्यार्थी सुरक्षित नाहीत, त्यांच्या जिवाला केव्हाही अपाय होऊ शकतो अशी परिस्थिती वारंवार निर्माण होते. कुठलेही मेडिकल कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कायमची उपाययोजना करीत नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. विद्यार्थी त्यांची मागणी रेटून धरतात मात्र प्रशासन नेहमीच ढिम्मच असते त्यामुळे अश्या माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत राहतात. नुकत्याच घडलेल्या या जघन्य अपराधामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये भयाचे वातावरण तयार झाले आहे. त्यात शांतपणे निषेध व्यक्त करणाऱ्या पदव्युत्तर डॉक्टरांवर तसेच रूग्णालयात जो हल्ला कोलकात्यातील त्याच मेडीकल कॉलेज मधे झाला तो तर अधिकच भयावह आहे, शरीराचा थरकाप उडविणारा आहे. या सर्व लाजिरवाण्या अमानवीय घटनांच्या विरोधात आयएमए अकोला आणि आयडिए, जिपीए, निमा, जीमा, एमएसएमआरए, आयएपी, ए्एपी, पिएएमपी, एसिपीएल इत्यादी वैद्यकीय संघटनांनी एकजुटीने अकोल्यात जाहीर निषेध मुक मोर्चा आयोजित केला होता. या मुक मोर्चात जवळ जवळ १५०० डॉक्टर्स उत्फुर्तपणे सहभागी झाले होते. हा निषेध मोर्चा आयएमए येथून सकाळी ९ वाजता सुरू होऊन दुर्गा चौकातुन अग्रसेन चौक मार्गे टॉवर चौकातुन परत आयएमए हॉलला ११ वाजता सभा संपन्न होऊन समाप्त झाला. सभेमध्ये प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांवरील वाढत्या हिंसाचाराबद्दल रोष व्यक्त करून कडक उपाययोजना करायला हवी असे स्पष्ट मत मांडले. या निषेध मोर्चासाठी पोलिस बंदोबस्त एकदम चोख होता. प्रत्येक चौकात सहभागी डॉक्टरांना सुरक्षित चौक पार पाडता यावा यासाठी पोलिसांची बऱ्यापैकी दमछाक ही झाली. मोर्चेकऱ्यांसाठी डॉ. रविंद्र चौधरी, डॉ. प्रमोद चिराणीया आणि डॉ. गजानन भगत यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वयंस्फूर्तीने केली होती. या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी आयएमए अध्यक्ष डॉ. राजेंद्रकुमार सोनोने, सचिव डॉ. सागर भुईभार, डॉ. नितीन उपाध्ये, आयडिए चे अध्यक्ष डॉ. सचिन वानखडे, निमाचे डॉ. पंकज गुप्ता, डॉ. योगेश शाहू, डॉ. शाम शर्मा, जिपीएचे डॉ. उटांगळे, डॉ. विनय दांदळे, एएपी चे डॉ. लढ्ढा, एमएसएमआरए चे शशिकांत देशमुख, उमाकांत पाटील, एसिपीएलचे संजय सरोदे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.