अकोला :- सनातन धर्म आणि संस्कृतीचे दमन करण्यासाठी इंग्रजांनी हिंदू मंदिरं आणि देवस्थानं आपल्या ताब्यात घेतली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्ष झाली तरी मंदिरं आणि देवस्थानांवर शासनाचा कब्जा कायम आहे. ती मुक्त करण्यात यावीत या आशयाचे निवेदन सनातन संस्कृती महासंघा तर्फे पंतप्रधान भारत सरकार यांना जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत देण्यात आले. निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना देखील पाठवण्यात आली आहे.
निवेदनात म्हंटले आहे कि देशातील ४ लाखवर हिंदू मंदिरं आणि देवस्थानांवर शासनाचा कब्जा आहे. शासनातर्फे अनेक मंदीरं विविध कारणास्तव जमीनदोस्त करण्यात आली आहेत. मंदिराच्या मालकीच्या जमीनी व इमारतींची विक्री देखील करण्यात आली असून, काही गैरहिंदूंना आवंटित केल्या आहेत. काही ठिकाणी नेमण्यात आलेले विश्वास्त देखील गैरहिन्दू आहेत. मंदिराच्या उत्पन्नाचा विनियोग सनातन धर्म आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी केला जात नाही. भारतीय संविधानाचे कलम २५ आणि २६ अन्वये हिंदूना धार्मिक अधिकार आणि स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे. त्याची हि शुद्ध पायमल्ली असून, सनातन धर्माचे दमन सुरू आहे.
भारतीय संविधानाने हिंदूंना प्रदान केलेले अधिकार आणि स्वातंत्र्यानुसार शासनाच्या अधिपत्याखाली असलेली सर्व हिंदू मंदिरं आणि देवस्थानं मुक्त करण्यात यावीत. मंदिराच्या उत्पन्नाचा विनियोग सनातन धर्म आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी तसेच हिंदूंच्या हितासाठी होईल, याची व्यवस्था करावी. अशी मागणीही सनातन संस्कृती महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे.